मुंबई : अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध वाढल्याने भारताला नुकसान होण्याऐवजी फायदा होईल अशी अपेक्षा वाढल्याने भारतातील शेअर बाजार सलग तिसऱ्या सत्रात वाढला आहे. सेन्सेक्स ३०९ अंकांनी वाढून ७७,०४४ वर बंद झाला, तर निफ्टीमध्ये १०८ अंकांनी वाढ झाली.
परदेशी गुंतवणूकदारांकडून भांडवलाचा ओघ वाढला व प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदीमुळे बाजारात तेजीचे वातावरण राहिले. सरकारकडून आणखी चांगले निर्णय घेतले जाण्याची अपेक्षा बाजाराला आहे.
जगातील बाजार घसरले : आशियाई बाजारांमध्ये, दक्षिण कोरियाचा कॉस्पी, जपानचा निक्की आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे घसरणीत होते, तर चीनचा शांघाय एसएसई कंपोझिट वाढीत राहिला.
युरोपीय बाजारपेठांमध्ये घसरण दिसून आली. मंगळवारी अमेरिकन बाजारात घसरण झाली. कच्चे तेल ०.९१ टक्क्यांनी वाढून ६५.२२ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे.
‘टॅरिफमुळे बाजारपेठा हादरल्या आहेत’
नवी दिल्ली : अमेरिकेतील टॅरिफमुळे कर्जाची स्थिती कमकुवत होईल आणि कमी रेटिंग असलेल्या कंपन्यांचे कर्ज बुडण्याचा धोका वाढेल, असे रेटिंग एजन्सी मूडीज रेटिंग्जने म्हटले आहे.
शुल्कामुळे बाजारपेठा हादरल्या आहेत आणि जागतिक आर्थिक मंदीचा धोका वाढला आहे. सततची अनिश्चितता व्यवसाय नियोजनात अडथळा आणेल, गुंतवणूक रोखेल आणि ग्राहकांच्या भावनांवर परिणाम करेल. सध्या शुल्क स्थगितीमुळे कंपन्यांना नियोजन करण्यास वेळ मिळेल, मात्र ९० दिवसांनंतर व्यवसाय नियोजनात अडथळा येईल, गुंतवणूक थांबेल आणि वाढ मंदावेल, असे मूडीजने म्हटले आहे.