कोरोनाकाळात खासगी वाहन वापरण्यावर अधिक भर देण्यात आला. त्यामुळे कारच्या खरेदीत अलीकडे वाढ झाल्याचं आढळून आलं. परंतु आता वाढते व्याजदर यामुळे हा ट्रेंड काहीसा कमी होताना दिसतोय. असं असलं तरी गाडी घेण्याची हौस प्रत्येकाला असतेच. त्यासाठी कर्जाचे पर्याय शोधले जातात. गाडीसाठी कर्ज घेताना गाही गोष्टींचा बारकाईने विचार होणं गरेजेचं आहे. दरम्यान, कार लोनचे निरनिराळ्या बँकांचे व्याजदर निरनिराळे असतात.
कार लोन हे जुन्या किंवा नव्या वाहनांसाठी घेता येऊ शकतं. परंतु नव्या वाहनांच्या तुलनेत जुन्या वाहनांसाठी दिल्या जाणाऱ्या लोनचं व्याज मात्र अधिक असतं. त्यामुळे त्यासाठी अधिक पैसे भरावे लागतात. नव्या कारसाठी सात वर्षांपर्यंतचा कालावधी मिळू शकतो. कार लोनसाठी तुम्हाला ओळखीचा पुरावा, रहिवासी पुरावा, पासपोर्ट साईज फोटो, गाडीची कागदपत्रे, ३ महिन्यांच्या सॅलरी स्लिप, बँक स्टेटमेंट आणि इन्कम टॅक्स रिटर्नची गरज भासते.
नवी कार घेताना काही ठराविक बँकांचे प्रतिनिधी संबंधित शोरूम्समध्ये असतात. त्यांच्याद्वारे तुम्हाला लोनची प्रक्रिया करता येते. जुन्या कारसाठीचे व्याजदर आणि नव्या कारसाठीचे व्याजदर यात मोठा फरक असतो. तुम्हाला सेकंड हँड कार घ्यायची असेल तर कर्जावर आकारला जाणार व्याजदर हा अधिक असतो.