जपानची ऑटो कंपनी सुझुकी मोटरचं भारतीय युनिट, टोयोटा मोटरला आपलं पहिले इलेक्ट्रिक वाहन पुरवणार आहे. या दोघांनीही बुधवारी आपल्या निवेदनात ही माहिती दिली. दोन्ही कंपन्यांनी पहिल्यांदाच इलेक्ट्रिक वाहनांसाठी हातमिळवणी केली आहे. यापूर्वी सुझुकी आणि टोयोटा यांनी इंधनावर चालणाऱ्या वाहनांसाठी हातमिळवणी केली होती. दोन्ही कंपन्यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, हे इलेक्ट्रिक वाहन सुझुकी, टोयोटा आणि दैहात्सू मोटर यांनी एकत्रित तयार केलं आहे. मारुती सुझुकी पुढील वर्षी २०२५ मध्ये गुजरातमधील प्रकल्पात आपलं उत्पादन सुरू करेल. मारुती सुझुकीमध्ये सुझुकी मोटरचा बहुसंख्य हिस्सा आहे.
मारुती सुझुकीकडे ईव्ही नाही
सुझुकी आणि टोयोटा यांनी ज्या ईव्हीसाठी हातमिळवणी केली आहे, त्यांची निर्मिती मारुती सुझुकी गुजरातमधील प्लांटमध्ये करणार आहे. मार्केट शेअरनुसार देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीनं अद्याप भारतात आणि जगात कुठेही इलेक्ट्रिक कारची विक्री केलेली नाही. मात्र, टोयोटाच्या भारतीय युनिटनं बनवलेल्या हायब्रीड वाहनांची विक्री केली जाते. मारुती सुझुकीची गुजरात प्रकल्पात वार्षिक २.५० लाख युनिट्स क्षमतेची चौथी उत्पादन लाइन जोडण्याची योजना आहे. हे फक्त ईव्हीसाठी तयार केलं जाईल.
२०२६ पर्यंत लाँच होणार ईव्ही
सुझुकी आणि टोयोटा यांनी ज्या ईव्हीसाठी हातमिळवणी केली आहे, ती स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल (एसयूव्ही) असेल. यात ६० किलोवॅट अवर बॅटरी पॅक असेल. मात्र, त्याची रेंज अद्याप समोर आलेली नाही. टोयोटाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२६ मध्ये लाँच केली जाईल. सध्या त्याचं कोणत्याही प्लांटमध्ये उत्पादन न करता गुजरातमध्ये बनवण्याची योजना आहे. टोयोटानं या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत जगभरात १,०८,००० हून अधिक ईव्हीची विक्री केली, जी त्याच्या जागतिक विक्रीच्या १.५ टक्के आहे.