ATM In Panchavati Express: प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी भारतीय रेल्वेकडून नवनवीन चाचण्या घेतल्या जातात. नुकतीच एक चाचणी घेण्यात आली ज्यामुळे प्रवाशांना ट्रेनमध्ये एटीएममधून पैसे काढता येतील. भारतात पहिल्यांदाच ट्रेनमध्ये बसवण्यात आलेल्या एटीएमची यशस्वी चाचणी घेण्यात आली. पंचवटी एक्स्प्रेसच्या एसी डब्यात एटीएम बसविण्यात आलं होतं. नाशिकमधील मनमाड ते मुंबई दरम्यान ही गाडी धावते. ही चाचणी सुरळीत पार पडली असली तरी काही प्रसंगी मशिननं सिग्नल दिल्याची माहिती भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. ही गाडी कसारा ते इगतपुरी दरम्यान नो-नेटवर्क सेक्शनमधून जाते आणि त्या ठिकाणी बोगदाही येतो.
भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक इती पांडे यांनी, चाचणी अतिशय योग्य प्रकारे झाल्याचं म्हटलं. भारतीय रेल्वेकडून प्रवाशांची सोय केली जात आहे. यानंतर लोकांना चालत्या ट्रेनमधून रोख रक्कमही काढता येणार आहे. मशीनच्या कार्यक्षमतेवर अजूनही लक्ष ठेवण्यात येत आहे.
कोणत्या बँकेचे एटीएम?
सध्या या चाचणीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रनं उपलब्ध करून दिलेल्या एटीएमचा वापर करण्यात आला होता. डब्याच्या मागील बाजूस असलेल्या तात्पुरत्या पॅन्ट्री स्पेसच्या क्युबिकलमध्ये एटीएम बसविण्यात आलं आहे. एटीएम मशिनला शटर दरवाजानं संरक्षण दिलं जातं. भारतीय रेल्वेच्या या सुविधेमुळे अशा प्रवाशांना मदत होणार आहे ज्यांना ट्रेनमध्ये रोख रकमेअभावी समस्यांना सामोरं जावं लागतं किंवा जे दुर्गम भागातून प्रवास करतात.
ATM in Train
— The Other Side Of Horizon (@mystiquememoir) April 15, 2025
Good initiative by @Central_Railway@rajtodaypic.twitter.com/UWNw1p734a
रेल्वेत एटीएम बसवण्यासाठी मनमाड रेल्वे वर्कशॉपमध्ये एटीएम मशिनमध्ये विशेष रचना व तांत्रिक बदल करण्यात आले. याशिवाय कोचमध्ये काही स्ट्रक्चरल आणि इलेक्ट्रिक सपोर्ट चेंजही करण्यात आले होते. गाडीचा वेग आणि प्रवासादरम्यानही मशीन सुरळीतपणे काम करू शकेल यासाठी हे सर्व बदल करण्यात आले आहेत.
इतर गाड्यांमध्येही सुविधा?
ही ऑन-बोर्ड एटीएम सेवा लोकप्रिय झाल्यास इतर गाड्यांमध्येही ती सुरू केली जाईल, असं भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव एटीएम किऑस्क बंद केले जाऊ शकतात. याशिवाय सीसीटीव्हीच्या माध्यमातून एटीएमवर नजर ठेवली जाणार आहे.