Most Expensive Coffee Cup In UK : नुकताच सोशल मीडियावर मुंबईच्या ताज हॉटेलमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये एक मध्यमवर्गीय मुलगा २१२४ रुपये किमतीचा चहा पिताना दिसत आहे. यावरुन चहा इतका महाग असतो का? म्हणून सोशल मीडियावर राळ उठली होती. तुम्हालाही हा चहा खूपच महाग वाटत असेल तर थांबा. कारण, आता एका कॉफीची किंमत वाचून तुमच्या हृदयाची धडधड वाढू शकते. एक शेतकरी विकत असलेल्या या कॉफीची किंमत एखाद्याचा महिन्याचा पगार असू शकतो. हो, तुम्ही बरोबर वाचलत. ही जगातील सर्वात महाग कॉफी असल्याचा दावा केला जात आहे.
ही बातमी स्कॉटलंडची आहे. येथील मोसगिल ऑरगॅनिक डेअरीने ब्रिटनमधील सर्वात महागडी कॉफी सादर केली आहे. ही सामान्य कॉफी नाही, तर एक फ्लॅट व्हाईट कॉफी आहे, ज्यात एस्प्रेसोचे २ शॉट्स आणि वर वाफाळलेल्या दुधाची पातळ साई आहे. या अनोख्या कॉफीची किंमत २७२ पौंड (सुमारे २८,००० रुपये) आहे.
एका कॉफीच्या कपासाठी ही मोठी किंमत आहे. परंतु, या ऑफरमागचे कारण देखील तितकेच उदात्त आहे. मोसगिल ऑरगॅनिक डेअरीच्या क्राउडफंडिंग मोहिमेचा हा एक भाग आहे. या मोहिमेद्वारे ३४ शेअर्स खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना डेअरीच्या प्रमाणपत्रासह ही कॉफी मिळते. स्कॉटलंडमधील 13 कॅफेमध्ये ही कॉफी उपलब्ध असेल. याव्यतिरिक्त, गुंतवणूकदारांना फार्म टूर, दुधाच्या होम डिलिव्हरीवर सूट आणि इतर विशेष कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची सवलत देखील मिळेल.
शेती वाचवण्यासाठी उपक्रम
ही केवळ कॉफी नसून शेतीचे भविष्य वाचवण्याचा प्रयत्न आहे, असे डेअरीचे मालक ब्राइस कनिंगहॅम यांचे मत आहे. ३ लाख पौंड (सुमारे ३ कोटी रुपये) उभारण्याची आणि ९ लाख पौंड (९ कोटी रुपये) कर्ज घेण्यासाठी त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. या मोहिमेतून मिळालेल्या पैशातून दुग्ध उत्पादन दुप्पट करण्याची योजना आहे. यातून त्यांची उत्पादने लंडनला पोहोचवू शकतील. या शेताला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. १८ व्या शतकात प्रसिद्ध कवी रॉबर्ट बर्न्स यांनी येथे २ वर्षे काम केलं. यावेळी "ऑल्ड लँग सायन" आणि इतर अनेक प्रसिद्ध रचना त्यांनी रचल्या. बर्न्स हे स्कॉटलंडचे राष्ट्रीय कवी मानले जातात. डेअरीच्या प्रत्येक दुधाच्या बाटलीवर त्यांचे चित्र पाहायला मिळते.