Vishal Mega Mart IPO: स्विगी, ह्युंदाई मोटर इंडियापाठोपाठ यंदाचा आणखी एक बहुप्रतीक्षित आयपीओ येण्याच्या तयारीत आहे. हा आयपीओ विशाल मेगा मार्टचा आहे. विशाल मेगा मार्टचा आयपीओ पुढील महिन्याच्या मध्यापर्यंत गुंतवणुकीसाठी खुला होऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केदारा कॅपिटलच्या मालकीची विशाल मेगा मार्ट डिसेंबरच्या मध्यापर्यंत ८,००० कोटी रुपयांचा आयपीओ लाँच करण्याची योजना आखत आहे.
मनीकंट्रोलने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार २०२४ चा देशातील सर्वात मोठा प्रायव्हेट इक्विटी-सपोर्टेट आयपीओ आणि वर्षातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी शेअर विक्री नोव्हेंबरच्या अखेरीस होणार होती. मात्र, आता कंपनीनं पुढील महिन्याच्या मध्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे. गुंतवणूकदारांचा रस वाढविण्यासाठी विशाल मेगामार्ट लंडन आणि सिंगापूरसारख्या ठिकाणी रोड शोमध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांशी संवाद साधत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
विशाल मेगा मार्टकडून यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. आयपीओमध्ये होल्डिंग कंपनीकडून (समयत सर्व्हिसेस एलएलपी) शेअर्सची सेकंडरी विक्रीचाही समावेश आहे आणि सुपरमार्केट चेनचा नवं भांडवल उभारण्याचा हेतू नाही. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या मसुद्यानुसार कंपनीत समयात सर्व्हिसेसची ९६.५५ टक्के, तर सीईओ गुणिंदर कपूर यांची २.४५ टक्के हिस्सा आहे.
कंपनीचा व्यवसाय काय?
३० जून २०२४ पर्यंत, कंपनी ६२६ विशाल मेगा मार्ट स्टोअर्स आणि विशाल मेगा मार्ट मोबाइल अॅप्लिकेशन तसंच वेबसाइटद्वारे तीन प्रमुख श्रेणींमध्ये (कपडे, सामान्य कार्गो आणि फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स) उत्पादनं ऑफर करते. २०२३-२४ या आर्थिक वर्षात कंपनीला ८,९११.९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे, जो मागील आर्थिक वर्षात ७,५८६ कोटी रुपये होता.
कंपनीचा नफा ३२१.२७ कोटी रुपयांवरून ४६१.९३ कोटी रुपयांवर पोहोचला. विशाल मेगा मार्टचे कपडे, एफएमसीजी आणि इतर श्रेणीतील आपल्या ब्रँडवर अधिक लक्ष आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीच्या १९ ब्रँडची विक्री १०० कोटी रुपयांहून अधिक होती आणि प्रत्येकी ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्री झाली होती. ३० जूनपर्यंत विशालच्या ब्रँड्सचा महसुलात ७४.०९ टक्के वाटा होता. २०२२ ते २०२४ या आर्थिक वर्षांमध्ये ब्रँडच्या विक्रीतून मिळणाऱ्या महसुलात २७.७२ टक्के सीएजीआरन वाढ झाली आहे.
(टीप : यामध्ये केवळ सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)