मुंबई : जागतिक कमॉडिटी बाजारात तेलाच्या वाढलेल्या किमती आणि लंडन क्रूड ऑइल एक्सचेंजमध्ये कच्च्या तेलाचा भाव वाढल्याने भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी आज (बुधवार) सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलने लीटरमागे ९४ रुपयांचा टप्पा ओलांडला असून, दिल्लीत पेट्रोलचा दर ८७.६० रुपये प्रतिलीटर झाला आहे. (mumbai recorded highest fuel rate after petrol 30 paise and diesel 25 paise price hike today)
पेट्रोलियम कंपन्यांनी लीटरमागे पेट्रोलचा दर ३० पैसे, तर डिझेलच्या दरात लीटरमागे २५ पैशांनी वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ दिसून येत असल्यामुळे तेल कंपन्यांनी दरवाढीचा निर्णय घेतला. ब्रेंट क्रूड ऑइनचा दर प्रति बॅरल ६१ डॉलरवर गेला आहे.
फाटलेल्या नोटेचा अर्धाच तुकडा असला तरी आता नो टेन्शन, पैसे मिळणारच; जाणून घ्या काय आहे नियम?
मुंबईतील पेट्रोल-डिझेलचा दर
बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत झालेल्या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा दर लीटरमागे ९४.१२ रुपये आणि डिझेलचा दर लीटरमागे ८४.६३ रुपये झाला. मुंबईत पेट्रोलच्या दराने नवा उच्चांक गाठल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीत पेट्रोल ९० रुपयांच्या दिशेने वाटचाल करत आहे. आज दिल्लीत एक लीटर पेट्रोल ८७.६० रुपये आहे. डिझेलचा भाव ७७.७३ रुपये आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा दर ८९.९६ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८२.९० रुपये दर आहे. कोलकात्यात पेट्रोल ८८.९२ रुपये झाले आहे. डिझेलचा दर ८१.३१ रुपये झाला आहे. बेंगळुरूमध्ये पेट्रोल ९०.५२ रुपये झाला आहे तर डिझेल ८२.९० रुपये झाला आहे.
मुंबईत पेट्रोल शंभरी गाठणार?
इंधनदरात होणारी वाढ पाहता मुंबईत लवकरच पेट्रोल शंभरी गाठेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. देशभरातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर नव्वदीजवळ पोहोचले आहेत. गेल्या १० महिन्यांत पेट्रोलचे दर तब्बल १८ रुपयांनी वाढल्याचे सांगितले जात आहे. सरकारकडून पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा मिळताना दिसत नाहीए. याउलट, अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलवर शेती कर लावण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान, इंधन दरवाढ ग्राहकांचे कंबरडे मोडत असताना महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. तीन दिवस विश्रांतीनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेल दरात प्रत्येकी ३५ पैसे वाढ केली होती.