Mutual Fund Investment : गेल्या काही वर्षात गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड लोकप्रिय होत आहे. 'म्युच्युअल फंड सही है' हे वाक्य कधीतरी तुमच्याही कानावर आलंच असेल. शेअर मार्केटच्या तुलनेत म्युच्युअल फंडात जोखीम कमी आहे. कमी जोखमीत चांगला परतावा मिळत असल्याने आता सर्वसामान्य लोकही या पर्यायकडे वळत आहेत. म्युच्युअल फंडातील, विशेषत: इक्विटी म्युच्युअल फंडातील परतावा असाधारण आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला सलग १० वर्षे सरासरी १५ टक्के परतावा मिळाला, तर तुमचे पैसे १० वर्षांत दुप्पट होऊ शकतात. तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी बेस्ट ५ फंडाची माहिती घेऊन आलो आहेत.
लार्ज कॅप फंड (Large Cap Funds)
सध्याच्या बाजाराच्या ट्रेंडनुसार मोठं भांडवल असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये लार्ज कॅप फंडातील पैसा गुंतवला जातो. लार्ज कॅप फंडांच्या या श्रेणीतील गुंतवणूकदारांना गेल्या ५ वर्षांत सरासरी १९ टक्के परतावा मिळाला आहे, ज्यामुळे या फंडांमधील पैसा पुढील ५ वर्षांत दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. लार्ज कॅप फंडांमध्ये गुंतवणूक करणारे असे फंड तुम्हाला निवडावे लागतील.
मल्टी कॅप म्युच्युअल फंड (Multi Cap Mutual Fund)
मल्टी कॅप म्युच्युअल फंडातील पैसा सर्व श्रेणींमध्ये येणाऱ्या कंपन्यात गुंतवला जातो. उदाहरणार्थ, लार्ज कॅप फंड, मिडकॅप आणि स्मॉलकॅप फंडांमध्ये गुंतवणूक केली जाते. या फंडांची खास गोष्ट अशी आहे की ते बाजार भांडवलातील बदलानुसार त्यांचा पोर्टफोलिओ बदलत राहतात. हा सर्वात आकर्षक म्युच्युअल फंड म्हणून लोकप्रिय होत आहे. या फंडाने सरासरी २५ टक्के परतावा दिला आहे.
फ्लेक्सी कॅप फंड (Flexi Cap Funds)
फ्लेक्सी फंड हे असे फंड आहेत जे विविध सेक्टर आणि विविध प्रमाणात स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. हे विशेषतः स्टॉक मार्केटमधील बबल जोखमीचा प्रभाव कमी करते. यातील फंड व्यवस्थापक सक्रिय रोख कॉल देखील घेऊ शकतात. या श्रेणीतील फंडांनी गेल्या ५ वर्षांत २१ टक्के चक्रवाढ परतावा दिला आहे.
कॉन्ट्रा फंड (Contra Funds)
सध्याच्या मार्केट ट्रेंडनुसार, वधारणाऱ्या शेअर्समध्ये प्रत्येकाला गुंतवणूक करायची असते. पण जे शेअर्स वाढत्या मार्केटमध्येही फारसे वर जात नाहीत, अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची पद्धत कॉन्ट्रा फंडात अवलंबली जाते. कॉन्ट्रा फंड्स, नावाप्रमाणेच, विरोधाभासी चालींवर आधारित गुंतवणूक करतात. याचा रिस्क-रिवॉर्ड रेशो खूप चांगले आहे. ह्या फंडात अधिक जोखीम आहे. तशी काही वैशिष्ट्ये देखील आहेत. जसे की उच्च परतावा, दीर्घकालीन वाढ आणि पोर्टफोलिओमध्ये वैविध्य. जर तुम्ही त्यांचा परतावा ऐकला तर तुम्हाला धक्का बसेल, कारण गेल्या ५ वर्षात कॉन्ट्रा फंडांनी २७ टक्के उत्कृष्ट परतावा दिला आहे.
मल्टी ॲसेट ऍलोकेशन फंड (Multi Asset Allocation Funds)
हा फंड प्रत्यक्षात हायब्रीड फंडांच्या श्रेणीत येतात. या फंडांसाठी किमान ३ वेगवेगळ्या मालमत्ता वर्गांमध्ये १०-१० टक्के गुंतवणूक करणे आवश्यक आहे. या तीन फंडांमध्ये प्रामुख्याने इक्विटी आणि कर्ज आणि तिसरा मालमत्ता वर्ग सोने किंवा रिअल इस्टेट किंवा इतर कोणत्याही मालमत्तेतील गुंतवणूक असू शकतो. यात बहुतेक इक्विटी आणि हायब्रीड फंडांपेक्षा कमी जोखीम देखील असते. गेल्या ५ वर्षांत या फंडांनी सरासरी १९.२ टक्के परतावा दिला आहे.
डिस्क्लेमर : येथे दिलेली माहिती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी तज्ञाचा सल्ला घ्या.