Join us

SIP कडेही गुंतवणूकदारांनी फिरवली पाठ? फेब्रुवारी महिन्यातील धक्कादायक आकडेवारी समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 15:07 IST

SIP in Mutual Funds : शेअर बाजारात सातत्याने होत असलेली घसरण पाहून गुंतवणूकदार आता सावध झाले आहेत. फेब्रुवारी महिन्यातील आकडेवारी तर धक्कादायक आहे.

SIP in Mutual Funds : गेल्या ५ महिन्यांपासून शेअर बाजारात सातत्याने घसरण सुरू आहे. परिणामी फक्त शेअरच नाही तर म्युच्युअल फंड पोर्टफॉलिओ देखील लाल रंगात गेले आहेत. हळूहळू गुंतवणूकदारांचा धीर सुटत असून अनेकजण यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहेत. फेब्रुवारी महिन्यातील आकडेवारी याची साक्ष देत असून एसआयपीचा आकडा गेल्या २ महिन्यात पहिल्यांदाच २६००० कोटी रुपयांच्या खाली गेला आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडाने (AMFI) ही आकडेवारी जाहीर केली आहे. 

गेल्या महिन्यात एसआयपीचा आकडा २५९९९ कोटी रुपये होता, जो जानेवारीमध्ये २६४०० कोटी रुपये आणि डिसेंबरमध्ये २६४५९ कोटी रुपये होता. मासिक आधारावर, फेब्रुवारी महिन्यात SIP मध्ये १.५% ची घट झाली आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२४ मध्ये ३.३% ची घसरण झाली होती.

५५ लाख SIP पोर्टफोलिओ बंदAMFI डेटानुसार, फेब्रुवारी महिन्यात ५५ लाख SIP पोर्टफोलिओ बंद करण्यात आले असून SIP स्टॉपपेज रेशोने सर्वकालीन उच्चांक गाठला. जानेवारी महिन्यात ६१.३ लाख SIP पोर्टफोलिओ बंद करण्यात आले होते. फेब्रुवारीमध्ये एसआयपी थांबवण्याचे प्रमाण १२५% होते, जे जानेवारी महिन्यात १०९% होते. डिसेंबर महिन्यात ४४.९ लाख SIP पोर्टफोलिओ बंद केले गेले. त्यावेळी बंद करण्याचं प्रमाण केवळ ८३% होते. एसआयपी सुरू करण्याचा वेगही मंदावला आहे. फेब्रुवारी महिन्यात ४४ लाख नवीन SIP सुरू करण्यात आल्या. हेच जानेवारी महिन्यात ५६.१९ लाख आणि डिसेंबर २०२४ मध्ये ५४.२७ लाख नवीन एसआयपी सुरू झाल्या होत्या.

११ महिन्यांत आतापर्यंत २.६३ लाख कोटी रुपयांची SIPआर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या ११ महिन्यांत (एप्रिल-फेब्रुवारी कालावधी) एसआयपीच्या मदतीने २,६३,४२६ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. हा आकडा SIP गुंतवणुकीत ३२.२३% ची वार्षिक वाढ दर्शवितो. आर्थिक वर्ष 2024 मध्ये SIP द्वारे १,९९,२१९ कोटी गुंतवणूक होती. सतत वाढत्या गुंतवणुकीमुळे एसआयपी ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट (AUM) १२.३८ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. जे म्युच्युअल फंड उद्योगाच्या एकूण मालमत्तेच्या १९.२ टक्के इतके आहे.

इक्विटी फंडांचा प्रवाह फेब्रुवारीमध्ये २७% कमीइक्विटी फंडांमध्ये निव्वळ आधारावर २९,३०३ कोटी रुपयांचा ओघ आला आहे ,जो जानेवारी महिन्यात ३९,६८७ कोटी रुपये होता. मासिक आधारावर २७% ची घट झाली आहे. डेट फंडातून (-) ६,५२५ कोटी रुपये काढले गेले आहेत, जे जानेवारी महिन्यात १,२८,६५२ कोटी रुपयांचा सकारात्मक प्रवाह होता. हायब्रीड फंडांमध्ये ६,८०३ कोटी रुपयांची निव्वळ आवक झाली आहे, जी जानेवारी महिन्यात ८,७६७ कोटी रुपयांची निव्वळ आवक होती.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकशेअर बाजार