Mutual Funds : सप्टेंबर २०२४ पासून शेअर बाजारात सुरू झालेली घसरण थांबायचं नाव घेताना दिसत नाही. शेअर मार्केट सोडा आता म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ देखील रेड झोनमध्ये गेले आहेत. गेल्या काही दिवसांत मिड-कॅप समभागांमध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली. घसरणीचा सर्वाधिक फटका स्मॉल कॅप आणि मिडकॅप शेअर्सला बसला आहे. अशा परिस्थितीत अनेक म्युच्युअल फंड कंपन्यांनी मिड कॅप स्टॉकमधून पैसे काढण्यास सुरुवात केली आहे. तुम्ही जर एसआयपीद्वारे कुठल्याही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमचे नुकसान वाचवू शकते.
या म्युच्युअल फंड कंपन्यांनी शेअर्समधून काढले पैसे
शेअर बाजारातील सातत्याच्या घसरणीनंतर म्युच्युअल फंडांनी सावध पावलं टाकायला सुरुवात केली आहे. अनेक मोठमोठ्या फंडांनी ९ वेगवेगळ्या मिड कॅप स्टॉकमधून सर्व पैसे काढले आहेत.
एचडीएफसी म्युच्युअल फंडाने या कंपनीचे सर्व शेअर्स विकले
मिड-कॅप शेअर्समध्ये सुरू असलेली घसरण पाहून ६ म्युच्युअल फंडांनी ९ वेगवेगळ्या मिड-कॅप समभागांमधून पैसे काढले आहेत. एचडीएफसी म्युच्युअल फंडाने जानेवारीमध्ये टाटा केमिकल्सचे ३७.१७ लाख शेअर्स विकून पैसे काढले. तर एसबीआय म्युच्युअल फंडाने पर्सिस्टंट सिस्टमचे सुमारे १.५२ लाख शेअर्स विकले आहेत. अॅक्सिस म्युच्युअळ फंडाने टाटा टेक्नॉलॉजीचे ५.६४ लाख शेअर्स विकून पैसे काढले आहेत.
झी एंटरटेनमेंट आणि आयआरसीटीसीच्या शेअर्सलाही फटका
निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाने झी एंटरटेनमेंट तसेच आयआरसीटीटीचे शेअर्स विकून सर्व पैसे काढले आहेत. या म्युच्युअल फंड हाउसने झी एंटरटेनमेंटचे १.७८ कोटी शेअर्स आणि आयआरसीटीसीचे ७.६४ लाख शेअर्स विकले आहेत. क्वांट म्युच्युअल फंडाने जानेवारीमध्ये पूनावाला फिनकॉर्पचे १.४७ कोटी शेअर्स आणि रॅमको सिमेंटचे ९.९४ लाख शेअर्स विकले आहेत. याशिवाय या कंपनीने ग्लँड फार्माकडूनही पैसे काढले आहेत. तर, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने इंडियन हॉटेल्सचे ७.३४ लाख शेअर्स विकून पैसे काढले आहेत.