मध्यम ते दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय मानला जातो. परंतु अनेकदा गुंतवणूकदार गरजेच्या वेळी म्युच्युअल फंडातून पैसे काढून घेतात. परंतु हा योग्य मार्ग नाही. म्युच्युअल फंडातील युनिट्स रिडीम न करताही तुम्हाला गरजेच्या वेळी पैसे मिळू शकतात. तुम्हाला म्युच्युअल फंड युनिट्सवर कर्ज मिळू शकतं.
बँक किंवा फायनॅन्स कंपनी जिकडूनही तुम्ही कर्ज घ्याल, त्या तुमच्या म्युच्युअल फंड्सचे युनिट्स त्यांच्याकडे तारण ठेवून त्याच्या बदल्यात कर्ज देतात. यासाठी तुम्हाला फायनॅन्स कंपनी किंवा बँकेशी संपर्क करणं आवश्यक आहे. इंडिविज्युअल इन्व्हेस्टर्ससोबतच एनआरआय, फर्म, हिंदू युनायटेड फॅमिली, ट्रस्ट, कंपन्या आणि कोणतीही एंटिटी म्युच्युअल फंडावर कर्ज घेऊ शकतात. अल्पवयीन मुलांना म्युच्युअल फंडावर कर्ज दिलं जात नाही.
बँक किंवा फायनॅन्स कंपनी तुमच्या क्रेडिट स्कोअरच्या आधारावर कर्जाची रक्कम, कालावधी आणि व्याजदर निश्चित करते. हाय क्रेडिट स्कोअर तुम्हाला कमी व्याजदरावर कर्ज घेण्यास मदत करू शकतात. इक्विटी एमएफ प्रकरणात नेट असेट व्हॅल्यूच्या ५० टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकतं. फिक्स्ड इन्कम म्युच्युअल फंडाच्या बाबतीत एनएव्हीच्या ७० ते ८० टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकतं.
निरनिराळ्या बँका आणि फायनॅन्स कंपन्यांनुसार याचे व्याजदर निरनिराळे असू शकतात. महत्त्वाची बाब म्हणजे म्युच्युअल फंडाचे युनिट्स तुम्ही तारण ठेवल्यानंतर ते रिडीम करू शकत नाही. जरी तुम्ही म्युच्युअल फंडाचे युनिट्स तारण ठेवले असले तरी तुम्हाला डिविडंट आणि रिटर्नचा फायदा मिळू शकतो.
किती असू शकतं व्याजइक्विटी म्युच्युअल फंडाच्या बाबतीत, योजनेच्या मूल्याच्या कमाल ५० टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकतं. एनबीएफसी तुमच्या क्रेडिट स्कोअरवरून या कर्जासाठी ९-१० चक्के व्याज आकारतात. त्या तुलनेत, सोन्यावर घेतलेल्या कर्जाचे व्याजदर ९-२४ टक्क्यांपर्यंत असतात. तर पर्सनल लोनवर ग्राहकांकडून १०-१८ टक्के व्याज आकारलं जातं. म्युच्युअल फंडांवरील बहुतेक कर्जांचा कालावधी १२ महिन्यांचा असतो आणि किमान कर्जाची रक्कम १० हजार रुपये आणि कमाल रक्कम १ कोटी रुपये असते.
सोपी प्रक्रियाकर्ज देणाऱ्यांना लोकांना म्युच्युअल फंडाविरुद्ध कर्ज देण्याची प्रक्रिया सोपी केली आहे. त्यांनी संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि सुलभ केलीये. एनबीएफसी एक्झिक्युटिव्ह्सनी सांगितलं की, साधारणपणे, जितक्या दिवसांची रक्कम वापरली जाते तितक्या दिवसांसाठी वापरलेल्या रकमेवर व्याज आकारलं जातं आणि यासाठी कोणताही ईएमआय नसतो. कर्जाची रक्कम एका वर्षाच्या कर्ज कालावधीत कधीही परत केली जाऊ शकते आणि एक वर्षानंतर कर्जाचं नूतनीकरण करण्याचा पर्याय आहे. या प्रकारच्या कर्जानं वैद्यकीय आणीबाणीसारख्या गरजा भागवता येतील, असं मत फायनान्शिअल प्लॅनर्स व्यक्त करतात.
असं नुकसानही अशा कर्जाचा एक मोठा तोटा म्हणजे शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यास कर्जदाराला टॉप-अप करावं लागेल. म्हणजेच, इक्विटी म्युच्युअल फंडाचे मूल्य जितकं घसरलं आहे तितके पैसे कर्जदाराला आणण्यास सांगितलं जातं.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक किंवा आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा किंवा जाणकारांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)