Investment Tips: तुम्हाला तुमच्यासाठी मोठा फंड तयार करायचा असेल तर हे नक्कीच शक्य आहे. फक्त यासाठी तुम्हाला गुंतवणुकीची योग्य रणनीती बनवावी लागेल. म्हणजे केव्हा, कुठे आणि किती काळ गुंतवणूक करून तुमचा पैसा वेगाने वाढू शकतो याकडे लक्ष द्यावं लागेल. गुंतवणुकीच्या बाबतीत आणखी एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक करायला सुरुवात कराल आणि जितक्या जास्त वेळ ती कराल तितका तुम्ही भविष्यात मोठा फंड तयार करू शकता.
आजच्या काळात गुंतवणुकीच्या अनेक योजना उपलब्ध असल्या तरी, तुम्हाला कमी वेळेत मोठा नफा कमवायचा असेल, तर म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय मानला जातो. मार्केटशी लिंक्ड असूनही यात इतका नफा मिळताना दिसतो, जो इतर कोणत्याही योजनेत सहजासहजी मिळत नाही. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही काही वर्षांत याद्वारे मोठा फंड तयार करू शकता. जाणून घेऊया कसं...
असा मिळेल उत्तम रिटर्न
म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे (SIP) तुम्ही सहजपणे गुंतवणूक सुरू करू शकता. बाजाराशी निगडीत असल्यानं यात तुम्हाला किती परतावा मिळेल हे नक्की सांगता येत नाही. परंतु बहुतांश तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास सरासरी १२ टक्के परतावा मिळू शकतो. तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल आणि जितकी जास्त रक्कम असेल तितका मोठा निधी तयार होईल.
५००० हजारांची गुंतवणूक
एसआयपी कॅल्क्युलेटर नुसार, तुम्ही दर महिन्याला ५००० रुपयांच्या एसआयपीद्वारे २५ लाख रुपयांचा निधी जमा करू शकता. मात्र यासाठी तुम्हाला किमान १५ वर्षे गुंतवणूक करावी लागेल. १५ वर्षांसाठी ५००० रुपये गुंतवून तुम्ही एकूण ९ लाख रुपयांची गुंतवणूक कराल, परंतु त्या बदल्यात तुम्हाला १२ टक्के दरानं १६,२२,८८० रुपये परतावा मिळेल.
अशा प्रकारे, १५ वर्षांमध्ये, तुम्ही ९,००,०० + १६,२२,८८० = २५,२२,८८० रुपयांपर्यंत जोडू शकता. जर तुम्ही ही गुंतवणूक आणखी ५ वर्षे म्हणजे २० वर्षांपर्यंत चालू ठेवली तर १२ टक्के परताव्यानुसार तुम्ही ४९,९५,७४० रुपये सहज जोडू शकता. जर परतावा चांगला असेल तर नफा आणखी चांगलाही मिळू शकतो.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)