Mutual Fund SIP: शेअर बाजारात सातत्यानं घसरण होत असली तरी म्युच्युअल फंडात एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदाराचा आत्मविश्वास डळमळीत होत नाही. अनेक जण सातत्यानं एसआयपी करत आहेत. दरम्यान, एसआयपीच्या तारखेचा म्युच्युअल फंडांच्या परताव्यावर परिणाम होतो का, असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. म्युच्युअल फंडातून मिळणारा परतावा एसआयपीच्या तारखेपासून ठरवला जातो का? महिन्याच्या ठराविक तारखेला गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो का? तुम्हीही या प्रश्नाचं उत्तर शोधत असाल तर याचं उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
तारखेनं फरक पडतो का?
म्युच्युअल फंडातून मिळणाऱ्या परताव्यावर एसआयपीच्या तारखेचा फारसा फरक पडत नसल्याचं बाजार तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अशा प्रकारे शेअर बाजारात पैसे गुंतवल्याच्या तारखेपासून संपत्ती निर्मिती होत नाही, तर ती बाजारात किती काळ राहते, यावरून किती संपत्ती निर्माण होईल हे ठरवलं जातं. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सातत्यपूर्ण गुंतवणुकीवर भर दिला पाहिजे आणि संपत्ती निर्माण करण्यासाठी दीर्घ काळ गुंतवणूक केली पाहिजे. गुंतवणुकीची विशिष्ट तारीख निवडल्यानं फरक पडतो का हे शोधण्यासाठी बरेच संशोधन केलं गेलं आहे आणि त्याचा कॉर्पसवर कोणताही परिणाम होत नसल्याचं आढळून आलंय. त्यामुळे गुंतवणूकदार एसआयपीसाठी कोणतीही तारीख निवडू शकतात.
जर तुम्ही डेली, वीकली किंवा मंथली एसआयपी करत असाल तर त्याचा तुमच्या परताव्यावरही फारसा परिणाम होत नाही. गेल्या १० वर्षांतील एसआयपीच्या सरासरी परताव्याच्या आधारे ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे असतील तर एसआयपी करा. दीर्घ मुदतीत तुम्हाला याद्वारे चांगला परतावा मिळू शकतो.
(टीप - यामध्ये केवळ म्युच्युअल फंडातील कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)