Join us

इक्विटी Mutual Funds च्या गुंतवणूकीत मोठी वाढ, SIP द्वारे झाली ८,६३७ कोटींची गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 2:03 PM

पुन्हा या गुंतवणूकीनं गाठला तीन महिन्यांतील उच्चांकी स्तर.

भारतीय शेअर बाजारावरीलगुंतवणूकदारांचा विश्वास वाढत आहे. सध्या शेअर बाजारात सकारात्मक वातावरण आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच जूनमध्ये शेअर बाजारात बंपर तेजी दिसून आली होती. तेजीसह शेअर बाजारानं उच्चांक गाठला होता. याचा परिणाम म्हणून, जून 2023 मध्ये, इक्विटी म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीत 166 टक्क्यांची वाढ झाली आहे. इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये जून महिन्यात तब्बल 8,637 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. ही तीन महिन्यांतील उच्चांकी गुंतवणूक आहे. म्युच्युअल फंड कंपन्यांची संघटना असलेल्या अॅम्फीनं जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

यापूर्वी, मे महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात 3,240 कोटी रुपये आणि एप्रिलमध्ये 6,480 कोटी रुपयांची गुंतवणूक आली होती. याशिवाय मार्च महिन्यात 20,534 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाली. तेव्हापासून गुंतवणुकीत वाढ होताना दिसत आहे.

सलग चौथा महिना...जूनमध्ये एकूण 14,734 कोटी रुपये एसआयपीद्वारे इक्विटी फंडांमध्ये गुंतवले गेले, तर मे महिन्यात हा आकडा 14,749 कोटी रुपये होता. हा सलग चौथा महिना आहे जेव्हा एसआयपीमधील गुंतवणूक 14,000 कोटींच्या पुढे गेली आहे. स्मॉल कॅप फंडांमध्ये गुंतवणूकदारांनी सर्वांधिक 5,472 रुपयांची गुंतवणूक केली. यानंतर व्हॅल्यू फंड्समध्ये 2,239 कोटी रुपये आणि मिडकॅप फंड्समध्ये 1,749 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली.

काय म्हणाले तज्ज्ञ?"2023 च्या पहिल्या सहामाहीत मोठ्या कंपन्यांची कामगिरी तितकीशी चांगली नसल्यामुळे, गुंतवणूकदारांनी स्मॉलकॅप फंडांकडे आपला मोर्चा वळवला," अशी प्रतिक्रिया फायर्सचे उपाध्यक्ष (रिसर्च) गोपाल कवलीरेड्डी यांनी दिली. इक्विटी व्यतिरिक्त, हायब्रिड योजनांमध्ये जून दरम्यान 4,611 कोटींची गुंतवणूक झाली.

(टीप - कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकपैसाशेअर बाजार