ज्या प्रकारे महागाई वाढलीये, त्याप्रमाणे १०० रुपयांचं मूल्यही आता पूर्वीइतकं राहिलेलं नाही. आपण आजकाल बाजारात गेलो आणि काही छोट्या मोठ्या वस्तू खरेदी केल्या तर १००-२०० रुपये कसे खर्च होतात हे आपल्याला समजत नाही. परंतु जर तुम्ही इतकी रक्कम वाचवून ती योग्य ठिकाणी गुंतवली तर तुम्ही काही वर्षांमध्ये लाखो रुपयांचा निधी जमा करुन आपली स्वप्न पूर्ण करू शकता. तुम्ही दररोज केवळ १०० रुपये वाचवून एखादी महागडी कार खरेदी करण्याइतके पैसे जमा करू शकता. पाहूया कसं...
समजा तुम्ही दररोज १०० रुपये वाचवात असाल तर अशा प्रकारे तुमचे दरमहा ३ हजार रुपये अगदी आरामात जमतील. हे ३ हजार रुपये तुम्ही कोणत्याही ठिकाणी गुंतवू शकता. आजच्या काळात दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एसआयपी ही उत्तम योजना मानली जाते. एसआयपीद्वारे तुम्ही म्युच्युअल फंडात पैसे गुंतवता. म्युच्युअल फंड हे शेअर बाजाराशी जोडलेले असतात. यामध्ये परताव्याची कोणतीही हमी नाही, परंतु दीर्घकालीन गुंतवणुकीत सरासरी १२ टक्क्यांपर्यंत परतावा मिळतो, जो आजच्या काळातील कोणत्याही स्कीमपेक्षा चांगला आहे.
जर तुम्ही महिन्याला म्युच्युअल फंडात ३ हजार रुपये गुंतवत असाल तर १५ वर्षांमध्ये ही रक्कम ५,४०,००० रुपये होईल. परंतु १२ टक्क्यांच्या हिशोबानं यावर तुम्हाला जवळपास दुप्पट परतावा मिळेल. १५ वर्षांमध्ये १२ टक्क्यांच्या हिशोबानं तुम्हाला ९.७३,७२८ रुपये व्याज म्हणून मिळतील. या प्रकारे तुम्हाला तुमचे गुंतवलेले पैसे आणि व्याजात मिळालेली रक्कम मिळून १५ वर्षांत १२ टक्क्यांच्या हिशोबानं १५,१३,७२८ रुपये मिळतील. याशिवाय जर तुम्ही ही गुंतवणूक २० वर्षांपर्यंत कायम ठेवली तर २० वर्षांनंतर तुम्हाला एकूण २९,९७,४४४ रुपये मिळतील. या रकमेतून तुम्ही महागडी कार सहजरित्या खरेदी करू शकाल.
बचतीचा फॉर्म्युला
आता प्रश्न येतो रोज १०० रुपये कसे वाचवता येतील. फायनान्शिअल अॅडव्हायझर दीप्ती भार्गव यांनी यासंदर्भात माहिती दिलीये. प्रत्येक व्यक्तीला आपल्या एकूण कमाईचा २० टक्के हिस्सा बचत केला पाहिजे. जर तुम्ही महिन्याला २०००० रुपयेदेखील कमावत असाल तर तुम्ही महिन्याला ४ हजार रुपये वाचवले पाहिजेत. जर तुम्ही रोज १०० रुपयांची बचत केली तर तुम्ही महिन्याला ३ हजार रुपयांची बचत कराल. कमी वेतन असलेल्यांनाही हे कठीण काम नाही, फक्त काही खर्चांना मुरड घातली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.
(टीप - कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)