Join us

Mutual Fund : म्युच्युअल फंड म्हणजे काय रे भाऊ?… जाणून घ्या तुमच्या कठीण प्रश्नांची सोपी उत्तरं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 9:31 AM

वाचा म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय? त्यातील गुंतवणूक जोखमीची असते का?

Mutual Fund : सध्या महागाई वाढतेय, पण त्या प्रमाणात आपली हवी तेवढी पगारवाढ होताना दिसत नाही. मग खर्च आणि उत्तप याची सांगड घालणं  कठीण होऊन बसतं. पैसे कुठून आणायचे किंवा पैशांसाठी विश्वासाचा पर्याय कोणता, पैसे बुडणार नाहीत ना? इतकंच काय तर हवे तेव्हा ते परत मिळतील का? अशा या सर्व कठीण प्रश्नांचं तुमच्यासाठी असलेलं सोपं उत्तर आहे ते म्हणजे म्युच्युअल फंड.

म्युच्युअल फंड या दोन शब्दांचे अर्थ समजून घेऊया. म्युच्युअल म्हणजे एकमेकांसाठी किंवा परस्परांशी संबंधित आणि फंड म्हणजे निधी किंवा पैसे. असं समजा की तुम्हाला जसा पैसे मिळवण्याचा विश्वासार्ह पर्याय हवा आहे तसाच तो खूप जणांना हवा आहे मग अशा सगळ्या गुंतवणूक करण्याची इच्छा असलेल्या लोकांचा पैसा हा एका हेतूने एकत्र केला तर त्याला म्युच्युअल फंड असे स्वरूप मिळते.

उदाहरणासह समजून घ्यायचं झालं तर एका ठिकाणाहून रोज २० कर्मचारी एकाच कार्यालयात काही वेळाच्या फरकानं जात असतात. अशा वेळी जर प्रत्येकानं आपली गाडी नेली तर त्याचा खर्चही वाढेल आणि प्रत्येकाला गाडी चालवण्यासाठी लागणारे कष्ट असतील ते वेगळेच. परंतु अशातच सर्वांसाठी एक बसची सेवा असेल तर? यासाठी होणारा खर्चही कमी असेल आणि त्या फायदाही सर्वांना होईल. अगदी असंच म्युच्युअल फंड करत असतात. परंतु ते या उदाहरणाइतकं सोपंही नसतं बरं का…

म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय?शेअर बाजाराचे ज्ञान नाही , पण पैसे गुंतवायची इच्छा आहे? शेअर बाजाराचे थोडेसे ज्ञान आहे पण एकरकमी भरपूर पैसे गुंतवता येत नाहीत ? शेअर बाजारातील जोखीम कमी हवी आणि थोडीशी मिळणाऱ्या उत्पन्नात स्थिरता सुद्धा हवी? या सगळ्या अपेक्षा म्युच्युअल फंड पूर्ण करू शकतो. गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या पैशाचे एका एक्सपर्टने केलेले व्यवस्थापन म्हणजेच म्युच्युअल फंड.

टॅग्स :गुंतवणूकपैसा