Join us

अंबानी आता Mutual Funds क्षेत्रात एन्ट्रीच्या तयारीत, Jio Financial नं ब्लॅक रॉकसोबत केला अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 10:32 AM

मुकेश अंबानींची आता म्युच्युअल फंड क्षेत्रात एन्ट्री होण्याची शक्यता आहे.

Mutual Fund News: मुकेश अंबानींची आता म्युच्युअल फंड क्षेत्रात एन्ट्री होण्याची शक्यता आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि ब्लॅकरॉक फायनान्शियल मॅनेजमेंटने (Jio Financial-BlackRock) यासाठी बाजार नियामक सेबीकडे अर्ज केला आहे. जिओ फायनान्शिअल आणि ब्लॅक रॉक यांनी भारतात म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्यासाठी सेबीकडे कागदपत्रे सादर केली आहेत.

३१ डिसेंबर २०२३ रोजी म्युच्युअल फंड अर्जांच्या अपडेटेड लिस्टनुसार दोन्ही कंपन्यांनी हा अर्ज १९ ऑक्टोबर २०२३ रोजी संयुक्त उपक्रम म्हणून केला होता. या प्रस्तावावर सेबीने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. ब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजर्स हा जगातील सर्वात मोठा फंड आहे. पूर्वी ते डीएसपी ब्लॅकरॉक म्हणून कार्यरत होते. परंतु डीएसपी आणि ब्लॅकरॉक २०१८ मध्ये वेगळे झाले. आता पुन्हा एकदा जिओ फायनान्शियल सर्व्हिसेससह ते यात एन्ट्री घेण्याच्या तयारीत आहेत.

आणखी कंपन्या रांगेतजिओ फायनान्शिअल-ब्लॅक रॉक (Jio Financial-BlackRock) व्यतिरिक्त अबिरा सिक्युरिटीजनं (Abira Securities) म्युच्युअल फंड परवान्यासाठी पुन्हा अर्ज केला आहे. अबिरा सिक्युरिटीज हे २०१२ मध्ये सुरू झालेले कोलकाता स्थित स्टॉक ब्रोकिंग हाउस आहे. अबिरा सिक्युरिटीजने यापूर्वी एप्रिल २०२२ मध्ये म्युच्युअल फंड परवान्यासाठी अर्ज केला होता, परंतु त्यानंतरच्या यादीत त्यांचं नाव नव्हतं. याशिवाय, एंजेल वनला मागील वर्षी ८ फेब्रुवारी २०२३ रोजी सेबीकडून तत्वतः मान्यता मिळाली होती, परंतु सेबीने अद्याप फायनल रजिस्ट्रेशनसाठी मंजुरी दिलेली नाही.या सर्वांशिवाय, केनेथ अँड्रेडच्या ओल्ड ब्रिज कॅपिटल मॅनेजमेंटला या वर्षाच्या सुरुवातीला सेबीकडून अंतिम मंजुरी मिळाली आहे. नोव्हेंबरमध्ये, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट फर्म युनिफी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडला (Unifi Capital Pvt Ltd) सेबीकडून म्युच्युअल फंड मॅनेजमेंटसाठी तत्वतः मान्यता मिळाली आणि सध्या ते सेबीकडून अंतिम मंजुरीची प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :मुकेश अंबानीसेबीजिओ