जर तुम्हाला शेअर बाजाराच्या (Stock Market) बारीकसारीक गोष्टींची फारशी माहिती नसेल, पण त्यात गुंतवणूक करून नफा मिळवायचा असेल, तर म्युच्युअल फंड (Mutual Fund) हा तुमच्यासाठी उत्तम पर्यायांपैकी एक आहे. परंतु म्युच्युअल फंड कसे काम करतात आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे समजून घेणं अनेकदा पहिल्यांदाच गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना कठीण जाते.
म्युच्युअल फंड म्हणजे काय?
म्युच्युअल फंड हे असे फंड आहेत, जे AMC म्हणजेच असेट्स मॅनेजमेंट कंपन्या ऑपरेट करतात. अनेक लोक या कंपन्यांमध्ये आपले पैसे गुंतवतात. म्युच्युअल फंडांद्वारे बॉन्ड, शेअर बाजारासह अनेक ठिकाणी पैसे गुंतवले जातात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर म्युच्युअल फंड हा अनेक लोकांच्या पैशाने बनलेला फंड आहे. इकडे एक फंड मॅनेजर असतो, जो वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षित पद्धतीनं पैशांची गुंतवणूक करतो. म्युच्युअल फंडाच्या मदतीनं तुम्ही केवळ शेअर बाजारातच नाही तर सोन्यातही गुंतवणूक करू शकता.
गुंतवणूकीपूर्वी या गोष्टींकडे द्या लक्ष
म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी खालील मुद्दे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. याद्वारे तुम्हाला गुंतवणुकीसाठी योग्य फंड निवडण्यात मदत होईल आणि तुम्ही वेळेनुसार पैशांचीही बचत करू शकाल.
रिस्क कॅपॅसिटीचं विश्लेषण करा
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी, प्रथम तुमची रिस्क कॅपॅसिटी आणि परताव्याच्या उद्दिष्टांचं विश्लेषण करा. म्हणजेच, जर तुमचं पुढील १० वर्षांसाठी ठराविक रकमेचे उद्दिष्ट असेल तर तुम्ही जोखीम देखील पत्करू शकता. त्यामुळे अशा परिस्थितीत ज्या ठिकाणी तुमचे दोन्ही उद्देश पूर्ण होतील अशा स्कीम निवडल्या पाहिजे. तसंच, म्युच्युअल फंड स्कीममध्ये जोखीम स्वीकारण्याची क्षमता आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याच्या आधारावर किती गुंतवणूक आवश्यक आहे हे समजून घेणंही आवश्यक आहे.
विभागून गुंतवणूक करा
एकाच असेटमध्ये सर्व गुंतवणूक करण्याऐवजी, त्यात विविधता आणणं आणि वेगवेगळ्या स्कीम्समध्ये गुंतवणूक करणे कधीही उत्तम. यासाठी गुंतवणूकदारांनी असेट अलोकेशन कसं करावं हे समजून घेतलं पाहिजे. असेट अलोकेशनचा फायदा असा आहे की जर एका असेट क्लासमध्ये चढ-उतार असतील, तर दुसऱ्यात होईलच असं नाही.
विचारपूर्वक स्कीम निवडा
गुंतवणूकदारांसाठी अनेक म्युच्युअल फंड स्कीम्स पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी तुम्ही तुमच्या गरजेनुसार स्कीम निवडू शकता. कोणत्याही म्युच्युअल फंड स्कीममध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, त्याची मागील कामगिरी, मॅनेजमेंट एफिशिअन्सी आणि खर्चाचे प्रमाण यासारखे काही महत्त्वाचे घटक तपासून पाहा. गुंतवणूकदार वेगवेगळ्या स्कीम्सची ऑनलाइन तुलना देखील करू शकतात.
एसआयपीमध्ये गुंतवणूक
जर तुम्हाला दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करून फंड तयार करायचा असेल, तर तुम्ही SIP द्वारे इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता. एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, ज्याच्या मदतीनं तुम्हाला बाजारातील चढ-उतारांमध्ये चांगले रिटर्न्स मिळण्यास मदत मिळते.
पोर्टफोलियोचं विश्वेषण करा
म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यापासूनच तुमच्या पोर्टफोलिओचं विश्लेषण करत राहीलं पाहिजे. तुमच्या ध्येयानुसार कोणती गुंतवणूक चांगली कामगिरी करत आहे आणि कोणती नाही हे यावरून दिसून येतं. असं असल्यास तुम्ही खराब कामगिरी करणाऱ्या गुंतवणुकीचं चांगल्या फंडात रूपांतर करू शकता. दुसरीकडे, जर कामगिरी तुमच्या अपेक्षेपेक्षा चांगली असेल, तर तुम्ही हाय रिस्क असलेल्या म्युच्युअल फंड स्कीममधून लो रिस्कच्या स्कीममध्ये स्विच करू शकता.
फंड मॅनेजरचा अनुभव
फंड मॅनेजर गुंतवणूकदार म्हणून म्युच्युअल फंडात पैसे गुंतवतो आणि पैशांचं व्यवस्थापन करतो. गुंतवणूकदारांनी अशा योजनांमध्ये गुंतवणूक करावी जिथे फंड मॅनेजरला ५ ते ७ वर्षांचा अनुभव असेल.
शार्प रेश्यो
शार्प रेशोचा वापर कोणत्याही म्युच्युअल फंडाच्या रिस्क परफॉर्मन्सचं मूल्यांकन करण्यासाठी केला जातो. स्कीममध्ये पैसे गुंतवून किती रिटर्न मिळू शकतात आणि जोखीम किती आहे हे या रेशोवरून दिसून येतं. जास्त शार्प रेशो असलेला फंड निवडणं हा एक योग्य निर्णय ठरू शकतो.
(टीप - यामध्या गुंतवणूकीसंदर्भात सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)