शेअर मार्केटमधील शेअर्समध्ये थेट गुंतवणूक करून तुम्हाला कोणताही धोका पत्करायचा नसेल, तर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. तुमचा पैसा म्युच्युअल फंडाच्या माध्यमातूनही बाजारात गुंतवला जातो, परंतु शेअर्समध्ये थेट पैसे गुंतवण्यापेक्षा ते कमी जोखमीचे मानलं जातं. अलिकडच्या काळात, म्युच्युअल फंडांद्वारे खूप चांगला परतावा मिळाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे, त्यामुळे लोक म्युच्युअल फंडाकडे अधिकाधिक आकर्षित होत आहेत.
म्युच्युअल फंडामध्ये (Mutual Funds) गुंतवणूक करण्याचे दोन लोकप्रिय मार्ग आहेत - एक म्हणजे लमसम (Lumpsum) आणि दुसरा एसआयपी (SIP). या दोन्ही पद्धतींचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. तुम्हालाही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असेल, तर लमसम आणि एसआयपीचे फायदे आणि तोटे समजून घेतले पाहिजे, जेणेकरून तुमच्यासाठी कोणती पद्धत सर्वोत्तम आहे हे तुम्हाला समजेल.
एसआयपी
प्रथम एसआयपीबद्दल बोलूया. एसआयपीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीनुसार दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवू शकता. तुम्ही याची सुरुवात १०० रुपयांपासूनही करू शकता. एसआयपीचा फायदा असा आहे की तुम्हाला त्यात लवचिकता मिळते, म्हणजेच तुम्ही तुमच्या उत्पन्नानुसार त्यात कालांतराने गुंतवणूक वाढवू किंवा कमी करू शकता, गरज पडल्यास ती मध्येच थांबवू शकता आणि कधीही पैसे काढू शकता.
आर्थिक तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की जर तुम्ही दीर्घकाळासाठी एसआयपीमध्ये पैसे गुंतवले आणि तुमचं उत्पन्न वाढतं तसं गुंतवणुकीत थोडी-थोडकी वाढ करत राहिल्यास आणि गुंतवणुकीच्या बाबतीत शिस्तबद्ध राहिल्यास, एसआयपीद्वारे तुम्ही एक मोठा फंड तयार करू शकता. एसआयपीचा फायदा हा आहे की तुम्ही बाजारातील सर्व चढ-उतारांदरम्यान त्यात गुंतवणूक करता. यामुळे तुमची सरासरी गुंतवणूक राहते. तथापि, एसआयपीचा तोटा असा आहे की तुम्ही बाजारातील कोणत्याही मोठ्या घसरणीचा फायदा घेऊ शकत नाही. याशिवाय तुम्ही कोणताही एसआयपीचा हप्ता भरायला विसरल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.
लमसम
जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडात एकरकमी पैसे गुंतवता, एकरकमी गुंतवणुकीचा फायदा असा आहे की तुम्ही बाजाराची स्थिती लक्षात घेऊन गुंतवणूक करू शकता आणि त्यातील चढ-उतारांचा फायदा घेऊ शकता. यामध्ये तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा दंड नाही. एकरकमी गुंतवणूकीत तुम्हाला एका निश्चित तारखेला सतत गुंतवणूक करण्याची गरज नसली तरी, जेव्हाही तुमच्याकडे एकरकमी पैसे असतील, तेव्हा तुम्ही ते म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवू शकता.
पण जेव्हा तुमच्याकडे मोठे भांडवल असेल आणि बाजाराची चांगली समज असेल तेव्हाच पैसे एकरकमी गुंतवावेत, असं आर्थिक तज्ज्ञांचं मत आहे. यामध्ये एक छोटीशी चूकही तुमचं नुकसान करू शकते. पण जर तुम्ही नवीन असाल आणि मार्केटमध्ये कमी रिस्क घेताना चांगला रिटर्न मिळवायचा असेल तर एसआयपी हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)