Mutual Fund : शेअर बाजारात पाण्यासारखा पैसा वाहत असतो. मात्र, शेअर्समध्ये गुंतवणूक करणे नेहमीच धोकादायक राहिले आहे. म्युच्युअल फंडातही जोखीम असतेच. पण, शेअर्सच्या तुलनेत ती खूपच कमी असते. गुंतवणूकदार जास्त परतावा मिळविण्यासाठी शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. मात्र, म्युच्युअल फंडांनी दीर्घकाळात शेअर्सपेक्षा जास्त परतावा दिला आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका म्युच्युअल फंड योजनेबद्दल सांगत आहोत. या योजनेने 2 हजार रुपयांच्या मासिक एसआयपीतून तब्बल १ कोटी रुपयांचा निधी तयार केला आहे.
HDFC टॉप १०० फंड परतावा
HDFC टॉप १०० फंड २८ वर्षांपूर्वी ४ सप्टेंबर १९९६ रोजी सुरू करण्यात आला होता. या MF योजनेने गेल्या एका वर्षात ३५.७१ टक्के परतावा दिला आहे. गेल्या ३ वर्षांत १८.५७ टक्के, तर ५ वर्षांत २०.०८ टक्के आणि गेल्या ७ वर्षांत १५.३६ टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्याने २५ वर्षांसाठी या योजनेत फक्त २००० रुपयांची मासिक SIP केली असेल, तर त्याचे कॉर्पस रुपये १,०३,७१,७६९ झाले असते, त्यापैकी ६,००,००० रुपये ही गुंतवलेली रक्कम असती. गेल्या २८ वर्षांत, या योजनेतील मासिक २००० रुपयांची SIP वाढून १,८३,८०,७८० रुपये झाली असते. त्याचप्रमाणे एचडीएफसी योजनेत १०,००० रुपयांची एसआयपी ९ कोटी १९ लाख ३ हजार ८९९ रुपये एवढी वाढली असते.
HDFC टॉप 100 फंडचा पोर्टफोलिओ कसा आहे?
ओपन-एंडेड योजनेने सर्वात जास्त गुंतवणूक आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक यांसारख्या वित्तीय शेअर्समध्ये केली आहे. या योजनेच्या पोर्टफोलिओमधील हे टॉप २ शेअर्स आहेत. या व्यतिरिक्त एनटीपीसी, लार्सन अँड टुब्रो, भारती एअरटेल, इन्फोसिस या आघाडीच्या कंपन्यांमध्येही या म्युच्युअल फंडाची गुंतवणूक आहे.
(Disclaimer- यामध्ये म्युच्युअल फंडाच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)