SIP Accounts Terminated: शेअर बाजारात घसरण झाल्याने म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. मध्यमवर्गीयांचं आवडतं असलेल्या म्युच्युअल फंड एसआयपीनंही भ्रमनिरास केल्याचं दिसून येतंय. डिसेंबर महिन्यात एसआयपी खाती बंद करण्याचे पूर्वीचे सर्व विक्रम मोडले गेले होते. बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, डिसेंबर महिन्यात ४५ लाख एसआयपी खाती बंद करण्यात आली. जी एका महिन्यातील उच्चांकी संख्या आहे.
यापूर्वी मे २०२४ मध्ये ४४ लाख एसआयपी खाती बंद करण्यात आली होती. गुंतवणूकदारांच्या या निर्णयामुळे बाजारातील दिग्गजही चिंतेत सापडले आहेत. शेअर बाजारातील कंपन्यांची चिंता अशी आहे की, पूर्वी एसआयपी गुंतवणूकदारांवर बाजारातील तात्कालिक चढ-उतारांचा परिणाम होत नव्हता आणि दीर्घकालीन गुंतवणुकीच्या माध्यमातून चांगला परतावा मिळत होता. परंतु एसआयपी गुंतवणूकदारांमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीच्या माध्यमातून संपत्ती निर्माण करण्याचा हा ट्रेंड आता संपुष्टात येत आहे.
नवी एसआयपी खातीही कमी
एसआयपी खाती तर बंद होत आहेतच, शिवाय नवीन एसआयपी खाती उघडणंही कमी होत आहे. डिसेंबरमध्ये केवळ ९ लाख एसआयपी खाती उघडण्यात आली, जी गेल्या सात महिन्यांतील सर्वात कमी आहे. एसआयपी गुंतवणूकदार लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून संपत्ती निर्माण करण्याचा ट्रेंड संपत असल्याचंही दिसून येतंय, असंही त्यांचं मत आहे.
एसआयपी खाती तर बंद होत आहेतच, शिवाय नवीन एसआयपी खाती उघडणंही कमी होत आहे. डिसेंबरमध्ये केवळ ९ लाख एसआयपी खाती उघडण्यात आली, जी गेल्या सात महिन्यांतील सर्वात कमी आहे. एसआयपी गुंतवणूकदार दीर्घकालीन कंपाउंडिंगमध्ये रुपयाच्या मूल्याच्या आधारे त्यांच्या गुंतवणुकीकडे पाहतात. असे असूनही खाते न उघडणं चिंताजनक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
चुकीच्या निर्णयांमुळे तोटा
गुंतवणुकीची उत्पादनं निवडताना निष्काळजीपणा किंवा समजूतदारपणाचा अभाव यामुळे कधीकधी तोटा होतो, असं आर्थिक बाजार तज्ज्ञांचं म्हणणं आहे. विशेषत: जे आर्थिक बाजारात नवीन आहेत, त्यांच्यासोबत हे प्रकार घडतात. शेअर बाजारातील एका तज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार एसआयपी गुंतवणूकदार अलीकडील कामगिरी आणि वर्षभराच्या परताव्याच्या आधारे फंडांची निवड करतात.
शॉर्ट टर्म आउटपरफॉर्मन्स आणि अंडरपरफॉर्मन्स येतात आणि जातात. कधीकधी, बाजारातील परिस्थिती किंवा व्यवस्थापन धोरणांमधील बदलांमुळे चांगला ट्रॅक रेकॉर्ड असलेले फंड देखील त्यांच्या बेंचमार्कपेक्षा खाली येतात. त्यामुळे अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी शांतपणे विचार करावा. कारण, भारतातील एसआयपी म्युच्युअल फंड अजूनही मजबूत स्थितीत आहेत आणि दीर्घ मुदतीत चांगला परतावा देत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)