Mutual Fund : सध्या म्युच्युअल फंड हा देशातील सर्वात लोकप्रिय गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे. याचं कारण म्हणजे यामध्ये गुंतवणुकीचे वैविध्य मिळते. दुसरं म्हणजे तुम्हाला स्वतः अभ्यास करण्याची गरज नाही. तर व्यावसायिक व्यवस्थापक (प्रोफेशनल्स मॅनेजर्स) तुमचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवतात. अर्थात त्यासाठी थोडे शुल्कही आकारले जाते. मात्र, ते फारच कमी असते. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूकदारांना साधारणपणे २ पर्याय दिले जातात. ज्यात नियमित आणि थेट योजनांचा समावेश असतो. दोघेही सारख्याच प्रकारे गुंतवणूक करतात. पण खरा फरक त्यांच्या खर्चात आणि व्यवस्थापनाच्या पद्धतीत आहे.
यामधील फरक समजून घ्या
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करतात आणि ते स्टॉक, बाँड किंवा इतर मालमत्तांच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये गुंतवतात. फंड व्यवस्थापकांच्या कौशल्याचा फायदा घेऊन गुंतवणूकदारांना परतावा मिळवून देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना, गुंतवणूकदारांना नियमित किंवा थेट योजना निवडण्याचा पर्याय मिळतो.
'डायरेक्ट प्लॅन' मध्ये गुंतवणूकदार कुठल्याही मध्यस्थीशिवाय थेट मालमत्ता व्यवस्थापन कंपनी (AMC) कडून म्युच्युअल फंड युनिट्स खरेदी करू शकतात. तर "नियमित योजनेत" गुंतवणूकदार वितरक किंवा दलालांमार्फत युनिट्स खरेदी करतात. यामध्ये तुमच्याकडून विशिष्ट शुल्क आकारले जाते.
खर्च रचना
नियमित आणि थेट म्युच्युअल फंडांमधील सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे खर्चाचे प्रमाण. तुमच्या फंडाचे व्यवस्थापन करण्यासाठी लागणारे शुल्क म्हणझे खर्चाचे प्रमाण. यामध्ये प्रशासकीय खर्च, व्यवस्थापन शुल्क आणि इतर ऑपरेटिंग खर्च समाविष्ट आहेत. थेट योजनांमध्ये कोणतेही मध्यस्थी नसल्यामुळे, AMC ला वितरण कमिशन देण्याची गरज नाही. त्यामुळे, खर्चाचे प्रमाण कमी आहे, ज्यामुळे गुंतवणूकीचा मोठा भाग परतावा मिळविण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
कमी खर्चाचे प्रमाण परताव्यावर परिणाम करते का?
डायरेक्ट प्लॅन्सचे कमी खर्चाचे प्रमाण अनेकदा गुंतवणूकदारांसाठी चांगल्या रिटर्न्सच्या स्वरुपात मिळते. कालांतराने खर्चाच्या गुणोत्तरातील लहान फरक देखील चक्रवाढीमुळे गुंतवणुकीच्या मूल्यावर लक्षणीय परिणाम करू शकतात. उदाहरणार्थ, २ योजना आहे, ज्यात एक नियमित आणि दुसरी थेट. दोन्ही १०% परतावा मिळवतात असं समजू. आता नियमित योजनेत १% आणि थेट योजनेसाठी ०.५% शुल्क आकारले जाते. तर दीर्घकालीन परताव्यातली फरक मोठा असू शकतो.
नियमित योजनांमध्ये गुंतवणूक करावी का?
थेट योजनेत कमी खर्चात गुंतवणूक करता येते. मात्र, बाजारात नवीन गुंतवणूकदारांसाठी नियमित योजना खूप फायदेशीर ठरू शकतात. नियमित योजनेचा एक मोठा फायदा म्हणजे आर्थिक सल्लागार किंवा वितरकांचे मार्गदर्शन मिळते. म्युच्युअल फंडाचे किचकट जग समजून घेण्यास गुंतवणूकदाराला एखादा प्रोफेशनल मिळाला तर त्याला अधिक फायदा होऊ शकतो.
कर आकारणीवरही लक्ष ठेवणे गरजेचे
नियमित आणि थेट योजनांची निवड करताना कर आकारणी लक्षात घेतली पाहिजे. या दोन्ही योजनांसाठी कर रचना समान आहे, कारण दोन्हीसाठी म्युच्युअल फंड फ्रेमवर्क समान आहे. नियमित आणि थेट दोन्ही योजना कॅपिटल गेन टॅक्सच्या अधीन आहेत, होल्डिंग कालावधी आणि फंडाच्या प्रकारावर (इक्विटी आणि कर्ज) हे अवलंबून आहे.
तुमच्यासाठी योग्य कोणतं?
नियमित आणि थेट म्युच्युअल फंडांमधील निर्णय मुख्यत्वे गुंतवणूकदाराच्या अनुभवावर, ध्येयांवर आणि प्राधान्यांवर अवलंबून असतो. अनुभवी गुंतवणूकदारांसाठी थेट योजना अधिक चांगल्या आहेत. जे स्वतःहून निर्णय घेऊ शकतात आणि दीर्घकालीन वाढीसाठी उपयुक्त आहे. हे गुंतवणूकदार कमी खर्चाच्या गुणोत्तरामुळे जास्त परतावा मिळवू शकतात. दुसरीकडे, नवीन गुंतवणूकदारांनी व्यावसायिक मार्गदर्शन घेतलं तर चांगला फायदा आणि नुकसान होण्याची शक्यता कमी करू शकतात.
डिस्क्लेमर : यामध्ये म्युच्युअल फंडातील योजनांविषयी माहिती देण्यात आली आहे. यात कुठल्याही प्रकारे गुंतवणुकीचा सल्ला दिलेला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करायची असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.