>> डॉ. पुष्कर कुलकर्णी, गुंतवणूक विश्लेषक
या भागात आपण जाणून घेऊयात अशा दोन फंड्सविषयी, ज्यात अनेक गुंतवणूकदारांनी रक्कम गुंतविली आहे.
लार्ज - मिडकॅप फंड हे लार्ज आणि मिड कॅपचे मिश्रण आहे. या प्रकारच्या म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवलेली रक्कम लार्ज आणि मिड कॅपमधील कंपन्यांमध्ये गुंतविली जाते. यामुळे फंड्समधील जोखीम विभागली जाते. म्युच्युअल फंडतर्फे ज्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची आहे त्याची यादी तयार करून एक बास्केट केली जाते. फंड्स अशा निवडलेल्या कंपन्यांच्या इक्विटी शेअर्समध्ये गुंतविले जातात. जर लार्ज कॅप सेक्टरमध्ये मंदी आल्यास त्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव खाली आले तर अशा वेळेस काही मिडकॅप कंपन्या उत्तम कामगिरी करू शकतात आणि त्यांचे भाव वाढतात. तेथून रिटर्न्स जास्त मिळतात. अशा प्रकारे दोन्ही सेगमेंटमधील कंपन्यांच्या कामगिरीवर परतावा ठरतो. मिड कॅपमधील कंपन्या टॉप लिस्टेड १०१ ते २५० या रँकमधील असतात. ५ ते २० हजार कोटी रुपये भागभांडवल असणाऱ्या कंपन्या मिड कॅपमध्ये मोडतात. सेबी नियमानुसार अशा म्युच्युअल फंडमधील किमान ३५ टक्के रक्कम लार्ज कॅप, तर किमान ३५ टक्के रक्कम मिड कॅप इक्विटीमध्ये गुंतविणे आवश्यक असते.
लार्ज - मिड कॅप म्युच्युअल फंड्सचे वार्षिक रिटर्न्स :
मागील १ वर्ष - ७ ते २० टक्के
मागील ३ वर्षं - १६ ते ३० टक्के
मागील ५ वर्षं - १२ ते १७ टक्के
मागील १० वर्षं - १५ ते २२ टक्के
हेही वाचाः भाग १ -
Mutual Funds मध्ये गुंतवणूक किती कालावधीसाठी करायची?... समजून घ्या सोपा फंडा
हेही वाचाः भाग २ -
म्युच्युअल फंड्सचे प्रकार किती आणि कोणते?; कुणामार्फत गुंतवता येतात पैसे?... जाणून घ्या
हेही वाचाः भाग ३-
म्युच्युअल फंडचा राजा 'इक्विटी फंड'; यात कसे मिळतात जास्तीत जास्त 'रिटर्न्स'?
याचप्रमाणे मिड कॅप म्युच्युअल फंडमधील रक्कम फक्त मिड कॅप सेगमेंटमधील कंपन्यांत गुंतविली जाते. मिड कॅप सेक्टरमधील कंपन्यांचे भागभांडवल ५ ते २० हजार कोटींच्या घरात असते. मिडकॅप शेअर्समधील गुंतवणूक रिस्क लार्ज कॅपच्या तुलनेत अधिक असते. गेल्या १० वर्षात भारतात मिडकॅप कंपन्यांची कामगिरी उत्तम राहिली आहे. त्यानुसार रिटर्न्सही उत्तम आहेत. सेबी नियमानुसार फंडमधील किमान ६५ टक्के रक्कम मिडकॅप इक्विटी शेअर्समध्ये गुंतविणे बंधनकारक असते.
मिडकॅप म्युच्युअल फंड्स चे वार्षिक रिटर्न्स :
मागील १ वर्ष - ७ ते २१ टक्के
मागील ३ वर्षं - १८ ते ३२ टक्के
मागील ५ वर्षं - १४ ते २४ टक्के
मागील १० वर्षं - १७ ते २२ टक्के
(स्रोत : ऑल इंडिया म्युच्युअल फंड असोसिएशन संकेतस्थळ)
गुंतवणूकदारांनी कृपया नोंद घ्यावी की म्युचअल फंडमधील परतावा विविध म्युच्युअल फंड संस्थांचा असून यात वेळोवेळी बदल होत राहतात. कोरोना पश्चात शेअर बाजार एकतर्फा वाढला. यामुळे तीन वर्षांतील रिटर्न्स सर्वोत्तम दिसत आहेत. विविध कॅपमधील फंड्समध्येही असे आवर्जून निदर्शनास येते.