Mutual Funds SIP: 'म्युच्युअल फंड सही है' हे शब्द तुमच्याही कधी ना कधी कानावर पडले असतील. मात्र, हे वाक्य आता सत्यात उतरतानाही दिसत आहे. गेल्या काही वर्षातील आकडेवारी पाहिली तर म्युच्युअल फंडात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढत आहे. सामान्य गुंतवणूकदार आता बँकांमध्ये जमा केलेले पैसे काढून ते म्युच्युअल फंडात गुंतवत आहेत. म्युच्युअल फंडामध्ये भरपूर जोखीम असते, तरीही लोक त्यामध्ये भरपूर पैसे गुंतवत असतात. म्युच्युअल फंडात एकरकमी पैसे गुंतवण्याबरोबरच दरमहा गुंतवणूकही करता येते. जर तुम्हीही या योजनेत पैसा गुंतवून श्रीमंत होण्याची स्वप्न पाहात असाल तर ५ टीप्स फॉलो करा अन् बिनधास्ता राहा.
शेअर मार्केटमध्ये थेट गुंतवणुकीची जोखीम उचलण्यापेक्षा म्युच्युअल फंडात ठराविक कालांतराने छोट्या रकमेतूनही गुंतवणूक करता येते. यालाच एसआयपीदेखील म्हणतात. म्युच्युअल फंड SIP मधून मोठी कमाई करण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. अगदी १०० रुपयांपासून तुम्ही यात गुंतवणूक करू शकता.
तुम्ही जितक्या लवकर सुरुवात कराल तितके जास्त पैसे कमवाल
जर तुम्हाला एसआयपीद्वारे मोठी कमाई करायची असेल तर पहिला नियम म्हणजे लवकरात लवकर एसआयपी सुरू करणे. जर तुम्ही अजून SIP सुरू केली नसेल, पण SIP सुरू करायची असेल तर तुम्ही विलंब न करता त्यात गुंतवणूक सुरू करावी.
जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करा
एसआयपीद्वारे मोठा फंड जमा करण्यासाठी तुम्ही शक्य तितक्या काळासाठी एसआयपी सुरू ठेवा. तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल तितका तुम्हाला चक्रवाढीचा फायदा होईल, ज्यामुळे तुमचे पैसे अधिक आणि जलद वाढतील.
SIP मध्ये खंड पडू देऊ नका
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा महत्त्वाचा नियम म्हणजे आर्थिक शिस्त. तुम्ही नियमित गुंतवणूक सुरू ठेवाव. त्यात खंड पडता कामा नये. तुम्ही तुमची SIP अधूनमधून थांबवल्यास, त्याचा तुमच्या एकूण परताव्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
स्टेप-अपमुळे मोठा नफा मिळेल
तुमचे उत्पन्न वाढत असेल तर तुमची SIP देखील वाढवत रहा. म्युच्युअल फंड एसआयपीमधील ही रणनीती स्टेप-अप म्हणून ओळखली जाते.
गरज आणि जोखमीनुसार योजना निवडा
म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करताना, तुम्ही सहन करू शकता तेवढी जोखीम घ्या. लार्ज कॅप फंड हे साधारणपणे मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंडांपेक्षा जास्त सुरक्षित मानले जातात. त्यामुळे म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये पैसे गुंतवताना तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेतल्यानंतरच गुंतवणूक करा.
(Disclaimer : यामध्ये म्युच्युअल फंडाच्या योजनेबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)