Power of SIP: जर तुम्ही ५०० रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात केली तर तुमच्याकडे २५ वर्षांत २१ लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा होऊ शकते. तुम्हाला कम्पाऊंडींगचा फायदा पाहायचा असेल, तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे म्युच्युअल फंड. आजकाल लोक एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात पैसे गुंतवत आहेत. म्युच्युअल फंड हे बाजाराशी निगडित आहेत, त्यामुळे त्यातील गुंतवणुकीवर परतावा मिळण्याची खात्री देता येत नाही, परंतु बहुतेक तज्ज्ञांचं मत असं आहे की यावर सरासरी १२ टक्के परतावा मिळतो. कोणत्याही हमी योजनेत तुम्हाला इतका परतावा मिळणार नाही. कधी कधी हा परतावा यापेक्षाही जास्तही असू शकतो.
अशा परिस्थितीत, जर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये दीर्घ काळासाठी एसआयपीद्वारे पैसे गुंतवले तर तुम्ही तुमच्या भविष्यासाठी चांगली रक्कम जोडू शकता. चांगली गोष्ट अशी की तुम्ही एसआयपीमध्ये ५०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि तुमचं उत्पन्न जसजसं वाढत जाईल, तसतसं तुम्ही वेळोवेळी त्यात थोडी वाढ करू शकता. तुम्ही किती मोठ्या रकमेनं एसआयपी सुरू करता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही ते किती काळ शिस्तीने सुरू ठेवता हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही ५०० रुपयांपासून एसआयपी सुरू करू शकता आणि लाखो रुपये जोडू शकता. पाहूया कसं.
असे जमतील २५ वर्षांत २१ लाख
तुम्ही एसआयपीमध्ये अगदी ५०० रुपयांची गुंतवणूक सुरू केल्यास, तुम्ही ही गुंतवणूक किमान २५ ते ३० वर्षे सुरू ठेवू शकता. तसंच, तुम्हाला या गुंतवणुकीत दरवर्षी किमान १० टक्क्यांनी वाढ करावी लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही ५०० रुपयांपासून गुंतवणूक करायला सुरुवात केली, तर पुढच्या वर्षी तुम्हाला ५०० रुपयांच्या १० टक्के म्हणजेच ५० रुपये, म्हणजेच ५५० रुपये गुंतवावे लागतील. पुढील वर्षी ५५० रुपयांच्या १० टक्के म्हणजेच ५५ रुपये त्यात जोडावे लागतील. अशा परिस्थितीत तुम्हाला त्या वर्षात ६०५ रुपये गुंतवावे लागतील.
त्याचप्रमाणे, तुम्हाला दरवर्षी १० टक्के रक्कम अॅड करुन तुमची गुंतवणूक सुरू ठेवावी लागेल. अशा प्रकारे, २५ वर्षांमध्ये तुमची एकूण गुंतवणूक ५,९०,०८२ रुपये होईल, परंतु तुम्ही १२ टक्के परतावा मोजल्यास, तुम्हाला केवळ व्याजातून १५,४७,६९१ रुपये मिळतील. अशा प्रकारे, २१ वर्षांनंतर तुम्हाला एकूण २१,३७,७७३ रुपये मिळतील.
३० वर्षात जमतील ४४,१७,०६२ रुपये
जर तुम्ही आणखी ५ वर्षे म्हणजे सुमारे ३० वर्षे गुंतवणूक चालू ठेवली तर तुमची एकूण गुंतवणूक ९,८६,९६४ रुपये होईल, परंतु १२ टक्के दराने त्यावर ३४,३०,०९८ रुपये व्याज मिळेल आणि ३० वर्षानंतर तुमच्याकडे एकूण ४४,१७,०६२ रुपये जमतील.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)