Join us

म्युच्युअल फंडचा राजा 'इक्विटी फंड'; यात कसे मिळतात जास्तीत जास्त 'रिटर्न्स'?

By पुष्कर कुलकर्णी | Published: December 18, 2023 3:03 PM

इक्विटी फंडमध्ये गुंतवलेली रक्कम थेट शेअर बाजारात जाते. गेल्या तीन दशकांचा अभ्यास केला तर शेअर बाजारातील गुंतवणुकीतून उत्तम रिटर्न्स मिळाल्याचे दिसते.

>> डॉ. पुष्कर कुलकर्णी, गुंतवणूक विश्लेषक

म्युच्युअल फंडमध्ये सर्वाधिक रक्कम इक्विटी फंड मध्ये गुंतविली जाते. याचे कारण स्पष्ट आहे की, यातूनच गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त रिटर्न्स मिळाले आहेत. इक्विटी फंडमध्ये गुंतवलेली रक्कम थेट शेअर बाजारात जाते. गेल्या तीन दशकांचा अभ्यास केला तर शेअर बाजारातील गुंतवणुकीतून उत्तम रिटर्न्स मिळाल्याचे दिसते. इक्विटी फंडच्या माध्यमातून विविध कॅप फंडमध्ये रक्कम गुंतविता येते. प्रत्येक फंडच्या रिटर्न्सचे प्रमाण वेगवेगळे राहते. प्रत्येक कॅपबाबत सविस्तर जाणून घेऊच.

या आहेत इक्विटी फंडच्या विविध कॅप्स

लार्ज कॅप लार्ज आणि मिड कॅप फ्लेक्सिकॅप फंड मिड कॅप स्मॉल कॅपव्हॅल्यू फंडईएलएसएस फंडकॉन्ट्रा फंडडिव्हीडंड यिल्ड फंडफोकस फंडसेक्टर फंड

लार्ज कॅप इक्विटी म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंडमध्ये लार्ज कॅप फंड हा एक मोठा फंड आहे. अनेक गुंतवणूकदारांनी विविध म्युच्युअल फंड ऑपरेटर मार्फत या फंड्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. याच फंडाला 'ब्लु चिप फंड' असेही संबोधले जाते. या फंडमधील रक्कम देशातील मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतविली जाते. या कंपन्या टॉप १०० प्रकारांत मोडणाऱ्या असतात. अशा कंपन्या अनेक वर्षे सातत्याने उत्तम व्यवसाय करीत असतात. शेअर बाजारातील चढ उतार लीलया पेलून शेअर होल्डर्स ना वर्षानुवर्षे उत्तमोत्तम रिटर्न्स देण्याची क्षमता राखतात. भारतातील अनेक उत्तम कंपन्यांचे भागभांडवल १ लाख कोटी रुपयांच्या वर आहे. रिलायन्स, एचडीएफसी, बजाज, टाटा, इत्यादी कंपन्यांचे भागभांडवल प्रत्येकी १० लाख कोटी रुपयांच्या वर आहे. यामुळे अशा आणि इतर अनेक उत्तम कंपन्यांच्या शेअर्समध्ये लार्ज कॅप म्युच्युअल फंड्सची गुंतवणूक असते. सेबीच्या नियमानुसार एकूण रकमेपैकी किमान ८५% रक्कम लार्ज कॅपमधील इक्विटीमध्ये गुंतविली जाते.

हेही वाचाः भाग १ - Mutual Funds मध्ये गुंतवणूक किती कालावधीसाठी करायची?... समजून घ्या सोपा फंडा

हेही वाचाः भाग २ - म्युच्युअल फंड्सचे प्रकार किती आणि कोणते?; कुणामार्फत गुंतवता येतात पैसे?... जाणून घ्या

लार्ज कॅप फंडमध्ये का गुंतवावेत?

१. लार्ज कॅप कंपन्या वर्षानुवर्षे सातत्याने उत्तम परतावा देतात.२. शेअर बाजारात या कंपन्या अधिक स्थिर राहतात.३. असे गुंतवणूकदार जे सातत्याने म्युच्युअल फंडात अनेक वर्षे गुंतवणूक करू आणि ठेवू इच्छितात अशा सर्वांना उत्तम परतावा मिळण्याची शक्यता अधिक.

लार्ज कॅप म्युच्युअल फंड्सचे वार्षिक रिटर्न्स :

मागील १ वर्ष  - ५ ते १४ टक्केमागील ३ वर्षं -  १५ ते २८ टक्केमागील ५  वर्षं - १२ ते १५ टक्केमागील १० वर्षे - ११ ते १६ टक्के(स्रोत : ऑल इंडिया म्युच्युअल फंड असोसिएशन संकेतस्थळ)

गुंतवणूकदारांनी कृपया नोंद घ्यावी की, म्युचअल फंड मधील परतावा विविध म्युच्युअल फंड संस्थांचा असून यात वेळोवेळी बदल होत राहतात. कोविड काळानंतर शेअर बाजार एकतर्फी वधारला. यामुळे तीन वर्षांतील रिटर्न्स सर्वोत्तम दिसत आहेत. विविध कॅप मधील फंड्समध्येही असे आवर्जून निदर्शनास येते.

पुढील भागात -  लार्ज - मिडकॅप आणि मिडकॅप म्युच्युअल फंडविषयी...

टॅग्स :गुंतवणूक