Mutual Fund : गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचं प्रमाण झपाट्याने वाढलं आहे. वर्षभरात जवळपास ४७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक म्युच्युअल फंडाद्वारे झाली आहे. यावरुन याची लोकप्रियता लक्षात येऊ शकते. म्युच्युअल फंडात सुरक्षित गुंतवणुकीची पद्धत म्हणजे एसआयपी. SIP मध्ये म्हणजेच सिस्टेमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅनिंग. तुम्ही ठराविक अंतराने एक निश्चित रक्कम दीर्घकाळासाठी जमा करता. चक्रवाढीच्या मदतीने तुमची ठेव एका मोठ्या फंडात रूपांतरित होते. परंतु, SIP व्यतिरिक्त, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा आणखी एक मार्ग आहे. ज्याबद्दल खूप कमी बोललं जातं.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची ही पद्धत एकरकमी आहे. यामध्ये तुम्ही एकरकमी रक्कम फंडात टाकू शकता. एसआयपी की लंपसम, म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी या २ पद्धतींपैकी कोणती पद्धत चांगली आहे? याबद्दल अनेकांच्या मनात गोंधळ पाहायला मिळतो. चला आज तुमच्या मनातील सर्व शंका दूर होतील
परताव्याच्या बाबतीत कोण पुढे आहे?
तुम्ही या २ पर्यायांद्वारे समान कालावधीसाठी समान परताव्यासह म्युच्युअल फंडामध्ये समान रक्कम गुंतवल्यास लंपसम गुंतवणुकीतून चांगला नफा मिळतो. यामागचे साधे कारण म्हणजे एकरकमीत पहिल्या दिवसापासून तुम्हाला मोठ्या रकमेवर परतावा मिळतो. तर एसआयपीमध्ये हाच परतावा मिळण्यासाठी आणखी वाट पाहावी लागेल.
उदाहरणावरुन समजून घेऊ
SIP : मासिक गुंतवणूक- ५ हजार रुपये, संभाव्य परतावा - १२ टक्के, वेळ- १० वर्षे.
दहा वर्षात एसआयपीद्वारे तुमची एकूण गुंतवणूक ६ लाख रुपये होते. यावर तुम्हाला १० वर्षात एकूण ५,६१,७०० रुपयांचा परतावा मिळेल. तुमची एकूण गुंतवणूक आणि परतावा मिळून ११ लाख ६१ हजार ७०० रुपये मिळतील.
एकरकमी : एकरकमी गुंतवणूक ६ लाख रुपये, संभाव्य परतावा – १२ टक्के, कालावधी – १० वर्षे. या पद्धतीमध्ये, तुमची एकरकमी ठेव १० वर्षांच्या अंतराने तुम्ही SIP मध्ये जमा केली होती, तशीच राहते. पण इथे पहिल्या दिवसापासून ६ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर परतावा मिळणे सुरू होते. त्यामुळे १० वर्षांसाठी संभाव्य परतावा १२,६३,५०० रुपये असेल. म्हणजे तुमची गुंतवणूक आणि परताव्यासह एकूण फंड १६ लाख ६३ हजार ५०० रुपये होतील. तुम्हाला एकरकमी गुंतवणुकीत ७ लाख रुपयांचा नफा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोणता पर्याय चांगला?
एसआयपी आणि एकरकमी या दोन्ही पर्यायांचे आपापली वैशिष्ट्ये आहेत. शेअर बाजारातील परिस्थितीवरुन तुम्हाला योग्य गुंतवणूक पर्याय निवडावा लागेल. म्हणजे जर बाजारात खूप अस्थिरता असेल तर एसआयपी हा पर्याय कधीही चांगला. तो तुमच्या गुंतवणुकीतील जोखीम कमी करतो. तर शेअर बाजार खूपच कोसळला असेल. तर त्यावेळी एकरकमी पर्यायातून चांगला परतावा मिळू शकतो.