Join us

रिटर्न्स कमी चालतील, पण ‘रिस्क’ नको रे बाबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2023 1:26 PM

इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक अर्ध्यावर

लाेकमत न्यूज नेटवर्क । नवी दिल्ली: इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक मे महिन्यात अर्ध्याने घटून ३,२४० कोटी रुपयांवर आली आहे. चढत्या बाजारात गुंतवणूकदारांनी नफा वसुली केल्यामुळे सलग दुसऱ्या महिन्यात गुंतवणूक घटली आहे. म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांची संघटना ॲम्फीने जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. वस्तुत: इक्विटी श्रेणीत भांडवल प्रवाह कायम राहण्याचा हा सलग २७वा महिना ठरला आहे.

गुंतवणुकीचा ओघ सुरूच

म्युच्युअल फंड उद्योगातील गुंतवणुकीचा ओघ मेमध्ये सुरूच राहिला. कर्ज-प्रधान योजनांत ५७,४२० कोटींची गुंतवणूक झाली. गेल्या महिन्यात यात १.२१ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. कर्ज आधारित योजनांत गेल्या महिन्यात ४६ हजार कोटींटी गुंतवणूक झाली. एप्रिलमधील १.०६ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत ती अर्ध्यापेक्षाही कमी आहे.

व्यवस्थापनाधीन संपत्ती वाढली

म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाधीन संपत्ती एप्रिलअखेरीस ४१.६२ लाख कोटी होती. ती मे अखेरीस वाढून ४३.२ लाख कोटी रुपये झाली आहे. मे महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडांत ३,२४० कोटी रुपये आले. एप्रिलमधील ६,४८० कोटी रुपयांच्या तुलनेत ही रक्कम अर्ध्यापेक्षाही कमी आहे. 

स्मॉल कॅप फंडातही ओघ

स्मॉल कॅप फंडातील गुंतवणूक एप्रिलमधील २,१८२ कोटी रुपयांवरून मे मध्ये ३,२८३ कोटी रुपयांपर्यंत वाढली. तर मिड कॅप फंडातील गुंतवणूक १,७९१ कोटींवरून १,१९६ कोटींवर  पोहोचली. डिव्हिडंड यील्ड फंडात २८९ कोटींची ओघ दिसला.

एसआयपीमध्ये वाढ

  • म्युच्युअल फंडांतील एसआयपी म्हणजेच मासिक हप्त्यांच्या गुंतवणुकीत मे २०२३ मध्ये ७.४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये एसआयपीद्वारे १३,७२८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.
  • मे मध्ये ती वाढून १४,७४९ कोटी रुपये इतकी झाली. डेट फंडांमध्ये या महिन्यात ४५९५९ कोटींचा ओघ आला. एप्रिल महिन्यात हे प्रमाण १.०६ लाख कोटी इतके होते. डेट फंडांमध्ये अल्पकालीन लिक्विड फंडांत ४५,२३४ कोटींची गुंतवणूक झाली.
टॅग्स :निधी