Join us

Jio Financial ला SEBI नं दिली गूड न्यूज, आता शेअरवर नजर; काय परिणाम होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 10:57 AM

Jio Financial Share SEBI : सोमवारी जिओ फायनान्शियलच्या शेअरवर गुंतवणूकदारांची नजर राहणार आहे. जाणून घ्या कशासाठी दिली सेबीनं परवानगी.

Jio Financial Share SEBI : बाजार नियामक सेबीनं (SEBI), मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस (Jio Financial Services) आणि ब्लॅकरॉक फायनान्शिअल मॅनेजमेंट इंक यांच्या संयुक्त उपक्रमाला म्युच्युअल फंड व्यवसायात प्रवेश करण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. आता सोमवारी जिओ फायनान्शियलच्या शेअरवर गुंतवणूकदारांची नजर राहणार आहे. शुक्रवारी हा शेअर १.९५ टक्क्यांनी घसरून ३३८.७५ रुपयांवर बंद झाला. ऑक्टोबर २०२३ मध्ये हा शेअर २०४.६५ रुपयांवर होता. शेअरची ही ५२ आठवड्यांतील नीचांकी पातळी आहे. तर एप्रिल २०२४ मध्ये शेअरचा भाव ३९४.७० रुपयांवर गेला होता. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे.

काय म्हणाली कंपनी?

सेबीनं आपली कंपनी आणि ब्लॅकरॉक फायनान्शियल मॅनेजमेंट इंकला को-स्पॉन्सर म्हणून काम करण्यास आणि ३ ऑक्टोबर २०२४ च्या पत्राद्वारे प्रस्तावित म्युच्युअल फंडाची स्थापना करण्यास मान्यता दिली आहे. जिओ फायनान्शियल, ब्लॅकरॉकने अटींची पूर्तता केल्यानंतर सेबी त्याला अंतिम मंजुरी देईल. जिओच्या म्युच्युअल फंड क्षेत्रातील प्रवेशामुळे उद्योगात स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे.

सप्टेंबरमध्ये संयुक्त उपक्रमाला सुरुवात

सप्टेंबरमध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने ब्लॅकरॉक अॅडव्हायझर्स सिंगापूर प्रायव्हेट लिमिटेडसोबत गुंतवणूक सल्लागार व्यवसाय करण्यासाठी संयुक्त उपक्रम स्थापन केला होता. जिओ ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजर्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना ६ सप्टेंबर रोजी झाली.

यामागील उद्देश काय?

गुंतवणूक सल्लागार सेवांचा प्राथमिक व्यवसाय करणं हा त्याचा उद्देश आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या ३० लाख इक्विटी शेअर्सच्या सुरुवातीच्या सब्सक्रिप्शनसाठी ३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजमधून वेगळी झालेली वित्तीय सेवा शाखा असलेल्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडनं यापूर्वी मालमत्ता व्यवस्थापन आणि संपत्ती व्यवस्थापनासाठी ब्लॅकरॉकसोबत संयुक्त उपक्रमाची घोषणा केली होती.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :जिओमुकेश अंबानीसेबी