Join us

नामांकित Mutual Fund वर SEBI ला संशय, टाकला छापा; फंडानं दिलं स्पष्टीकरण, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 9:37 AM

मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानं (SEBI) एका दिग्गज म्युच्युअल फंडाच्या काही ठिकाणांवर छापे टाकल्याची माहिती समोर आलीये. फ्रन्ट रनिंग प्रकरणात हे छापे टाकण्यात आलेत.

मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानं (SEBI) क्वांट म्युच्युअल फंडाच्या काही ठिकाणांवर छापे टाकल्याची माहिती समोर आलीये. फ्रन्ट रनिंग प्रकरणात हे छापे टाकण्यात आलेत. सेबीने शोध आणि जप्तीची कारवाई केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई आणि हैदराबादमध्ये शोध आणि जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी क्वांट डीलर्स आणि या प्रकरणाशी संबंधित लोकांचीही चौकशी करण्यात आली होती. 

क्वांट म्युच्युअल फंडाची सुरुवात संदीप टंडन यांनी केली होती. या फंडाला सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानं (सेबी) २०१७ मध्ये परवाना दिला होता. हा देशातील सर्वात वेगानं वाढणारा म्युच्युअल फंड (Mutual Fund) आहे. रिपोर्ट्सनुसार, फंड हाऊसकडे सध्या ९०,००० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. २०१९ मध्ये ती १०० कोटी रुपये होती. या वर्षी जानेवारीत कंपनीची मालमत्ता ५० हजार कोटीरुपयांच्या पुढे गेली होती. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये २६ स्कीम्स आणि ५४ लाख पोर्टफोलिओंचा समावेश होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑपरेशनमधून सुमारे २० कोटी रुपयांचा नफा झाला आहे. सेबीने आपल्या सर्व्हिलन्स टीमने संशयास्पद ट्रेडिंग पॅटर्न पकडले आहेत. यानंतर सेबीनं फंड हाऊसच्या कारभारावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. या वर्षी जानेवारीत फंड हाऊसकडे २६ स्कीम्स आणि ५४ लाख फोलिओंचा पोर्टफोलिओ होता. बाजार नियामक सेबी ही फ्रन्ट रनिंग संपवण्यासाठी म्युच्युअल फंडांवर आक्रमकपणे कारवाई करत आहे.

काय म्हटलं कंपनीनं?

"नुकतीच क्वांट म्युच्युअल फंडाला सेबीकडून एन्क्वायरी मिळाली आहे आणि आम्ही या संदर्भात आपल्या काही चिंतांचं निराकरण करू इच्छितो," असं कंपनीनं म्हटलंय. ही एक नियमित संस्था आहे आणि कोणत्याही पुनरावलोकनादरम्यान नियामकाला सहकार्य करेल. आम्ही सेबीला आवश्यक ती सर्व मदत करत राहू आणि नियमित आणि आवश्यक डेटा पुरवू, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. संदीप टंडन क्वांट एमएफचे संस्थापक आणि सीईओ आहेत. 

फ्रन्ट रनिंग म्हणजे काय?

भांडवली बाजारात काम करणाऱ्या लोकांच्या मते, फ्रन्ट रनिंग अॅक्टिव्हिटी त्याला म्हणतात, जेव्हा एखादा ब्रोकर किंवा गुंतवणूकदार कोणत्या ट्रेडमध्ये सहभागी होतो, कारण त्याला पहिल्यापासून त्या कंपनीची मोठी डील होणार आहे आणि त्यामुळे शेअर्सचे भाव वाढू शकतात याची माहिती असते. फ्रन्ट रनिंगला फॉरवर्ड ट्रेडिंग किंवा टेलगेटिंग असंही म्हणतात. जर एखाद्या स्टॉक ब्रोकरला किंवा गुंतवणूकदाराला कंपनी मोठी डील करणार याची माहिती मिळाली, तर ते बरेच शेअर्स अगोदर खरेदी करतात आणि डील जाहीर झाल्यानंतर, स्टॉकची किंमत वाढल्यावर ते विकून मोठा नफा कमावतात.

जेव्हा एखादा अॅनालिस्ट किंवा ब्रोकर वैयक्तिक खात्यातून शेअर खरेदी करतो किंवा विकतो आणि नंतर तो शेअर खरेदी किंवा विक्री करण्याबद्दल त्याच्या क्लायंटला सल्ला अथवा माहिती देतो तेव्हादेखील फ्रन्ट रनिंग देखील होऊ शकते.

गुंतवणूकदारांना नुकसान होणार का?

फंड मॅनेजर किंवा कंपनीच्या अशा गोंधळामुळे गुंतवणूकदारांचं नुकसान होऊ शकतं. या प्रकरणामुळे फंडाची विश्वासार्हता कमी होईल. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार त्यातून पैसे काढू शकतात.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :सेबीशेअर बाजार