Value Mutual Funds : कोट्यवधी रुपयांचा निधी जमा करण्यासाठी फक्त बचत करुन उपयोग नाही. तर वाचवलेले पैसे तुम्ही कुठे गुंतवता हे महत्त्वाचे आहे. गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंडांनी चांगला परतावा दिला आहे. एसआयपीद्वारे गुंतवणूक करुन अनेकजण कोट्याधीश झाले आहेत. म्युच्युअल फंडांना त्यांच्या गुंतवणुकीच्या आधारे लार्ज कॅप, मिड कॅप, फ्लेक्सी कॅप अशा अनेक श्रेणींमध्ये विभागले जाते. याशिवाय, लाभांश उत्पन्न, सेक्टोरल, ईएलएसएस टॅक्स सेव्हर आणि व्हॅल्यू म्युच्युअल फंड देखील आहेत. व्हॅल्यू फंड असे असतात जे कमी मूल्य असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. व्हॅल्यू म्युच्युअल फंड योजना दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांना फायदेशीर ठरू शकतात. कारण एखाद्या कंपनीचे खरे मूल्य ओळखण्यासाठी बाजाराला वेळ लागू शकतो. त्यामुळे शेअरची किंमत वाढण्यासही वेळ लागतो.
आज आम्ही तुम्हाला अशा ३ व्हॅल्यू म्युच्युअल फंड योजनांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी गुंतवणूकदारांना मासिक १०,००० रुपयांत कोट्याधीश केलं आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया (AMFI) च्या आकडेवारीनुसार, बंधन स्टर्लिंग व्हॅल्यू फंड, निप्पॉन इंडिया व्हॅल्यू फंड, एचएसबीसी व्हॅल्यू फंड आणि जेएम व्हॅल्यू फंड या गेल्या १० वर्षांतील सर्वोत्तम परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंड योजना आहेत. या योजनांनी गेल्या दशकात १४.३६ टक्के ते १६.८८ टक्के परतावा दिला आहे.
निप्पॉन इंडिया व्हॅल्यू फंड
ही योजना जून २००५ मध्ये सुरू करण्यात आली. या ओपन-एंडेड योजनेने तेव्हापासून १६.९५ टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्याने या योजनेत १७ वर्षे दरमहा १०,००० रुपये गुंतवले असतील, तर त्याचा कॉर्पस १६.८६ टक्के वार्षिक परताव्यासह १.०१ कोटी रुपये झाला असता.
जेएम व्हॅल्यू फंड
ही योजना जून १९९७ मध्ये सुरू करण्यात आली. या ओपन-एंडेड योजनेने तेव्हापासून १६.७४ टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्याने या योजनेत दरमहा १०,००० रुपये गुंतवले असतील तर त्याचा निधी १.०३ कोटी रुपयांपर्यंत वाढला असता. मात्र, या योजनेसाठी १ कोटी रुपयांचा निधी तयार होण्यासाठी १९ वर्षे लागली.
बंधन स्टर्लिंग व्हॅल्यू फंड
ही योजना मार्च २००८ मध्ये सुरू करण्यात आली होती. या ओपन-एंडेड योजनेने तेव्हापासून १७.०१ टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्याने १७ वर्षे या योजनेत दरमहा १०,००० रुपये गुंतवले असतील, तर त्याचा कॉर्पस १७.६२ टक्के वार्षिक परताव्यासह १.१० कोटी रुपये झाला असता..
(Disclaimer: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे. जर तुम्हाला यामध्ये पैसे गुंतवायचे असतील तर एखाद्या प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या. आम्ही कोणत्याही प्रकारे गुंतवणुकीचा सल्ला देत नाही.)