मागील काही दिवस बाजारात सातत्याने घसरण सुरू आहे. अशी पडझड सुरू असतानाही गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडावरील विश्वास केवळ कायमच नसून वाढल्याचं दिसत आहे. या काळातही दर महिन्याला ८ लाख नवे गुंतवणूकदार जोडले गेले आहेत. सप्टेंबर २०२४ पर्यंत संपलेल्या १२ महिन्यांत म्युच्युअल फंड इंडस्ट्रीत विक्रमी कामगिरी केली आहे. वेगानं नवे गुंतवणूकदार वाढल्यानं एकूण गुंतवणूकदारांची संख्या ४ कोटींवरून ५ कोटींवर पोहोचलीये.
बाजारातील तीव्र घसरणीमुळे इक्विटी स्कीम्सवरील परतावा कमी झाला असला तरी म्युच्युअल फंडात नवीन गुंतवणूकदारांची संख्या सतत वाढत आहे.
५ वर्षांत १० कोटींचे लक्ष्य
म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदार वेगाने वाढण्यामागे सध्याचा मजबूत इक्विटी बाजार आणि नवीन इक्विटी फंडांची आलेली लाट ही महत्त्वाची कारणं आहेत. आता इंडस्ट्रीचं लक्ष्य पुढील पाच वर्षांत म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांची संख्या दुप्पट करून १० कोटींपर्यंत पोहोचविण्याचं आहे.
चिंता कशामुळे वाढली?
- सध्या अशी खाती बंद होण्याची संख्याही वाढत आहे, ही बाब चिंतेची आहे.
- जानेवारी २०२५ मध्ये अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लान (एसआयपी) खात्यांमध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं.
- गुंतवणूक क्षेत्रातील जाणकारांच्या मते या ट्रेंडमागचं महत्त्वाचं कारण म्हणजे बाजारातील घसरण हेच आहे.
- परताव्याची खात्री उरली नसल्यानं गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्यावर भर दिलेला दिसतो.
सहा महिन्यांत प्रमाण जादा
मागील सहा महिन्यांत दर महिन्याला सरासरी १० लाख नवीन गुंतवणूकदार जोडले जात होते. परंतु, आता ही गती थोडी कमी झाली आहे.
येत्या काळात विक्रीचा दबाव वाढण्याची भीती
- म्युच्युअल फंड बाजारातील चढ उतारांच्या पार्श्वभूमीवर नवीन गुंतवणूकदार वाढणं हे मजबुतीचे प्रतीक असले तरी येणाऱ्या काही महिन्यात गुंतवणूकदारांची खन्या अर्थानं परीक्षा पाहिली जाणार आहे. या काळात विक्रीचा दबाव आणखी वाढू शकतो.
- फेब्रुवारीत निफ्टी मिडकॅपमध्ये १३ टक्के व स्मॉलकॅपमध्ये ११ टक्के घसरण झाली. मार्च २०२० अर्थात कोविड-१९ महासाथीनंतरची ही सर्वांत मोठी मासिक घसरण ठरली आहे.
- याशिवाय निफ्टी ६% घसरला. महिन्यांत तोटयात राहिला. त्यामुळे निफ्टी सलग पाचव्या महिन्यात तोट्यात राहिला. असं दीर्घकाळ चालणारं घसरणीचं चक्र सुमारे तीन दशकांनंतर दिसत आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)