Join us

म्युच्युअल फंडांनी 'या' शेअर्समध्ये ओतला सर्वाधिक पैसा! कोणते शेअर्स ठरले लूझर्स?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 13:42 IST

mutual fund portfolio : भारतीय शेअर बाजारातील घसरणीनंतरही म्युच्युअल फंडांमध्ये येणारा पैशांचा ओघ थांबलेला नाही. पण, शेअर्समध्ये बरीच उलाढाल दिसून आली आहे.

mutual fund portfolio : भारतीय शेअर बाजारात गेल्या ५ महिन्यांपासून सातत्याने घसरण होत आहे. या घसरणीतून दिग्गज कंपन्याही वाचल्या नाहीत. दुसरीकडे बाजारातील या घसरणीने दीर्घकालीन गुंतवणुकीच्या संधीही उपलब्ध करून दिल्या आहेत. कारण अनेक चांगल्या समभागांच्या किमती वाजवी पातळीवर आल्या आहेत. या घसरणीच्या काळात म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये बरेच बदल झाले आहेत. फंडांनी फेब्रुवारी महिन्यात अनेक स्टॉक्स खरेदी केले, तर त्यांनी अनेक स्टॉक्सची मोठ्या प्रमाणात विक्रीही केली. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने अशा काही शेअर्सचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

म्युच्युअल फंड बाजारातील कल आणि भविष्यातील शक्यता लक्षात घेऊन वेळोवेळी त्यांचा पोर्टफोलिओ अपडेट करतात. गेल्या काही महिन्यात अनेक फंडांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळाले. याची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत.

लार्ज कॅप स्टॉकफेब्रुवारी महिन्यातील म्युच्युअल फंडांच्या खरेदी-विक्रीवर नजर टाकल्यास, अदानी ग्रीन एनर्जी, वरुण बेव्हरेजेस, डॉ. रेड्डीज लॅब, एबीबी इंडिया लिमिटेड आणि हॅवेल्स या शेअर्समध्ये सर्वाधिक गुंतवणूक करण्यात आली. दुसरीकडे, म्युच्युअल फंडांनी मॅक्रोटेक डेव्हलपर्स, बजाज हाउसिंग फायनान्स, पंजाब नॅशनल बँक, ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स समभागांमधून पैसू काढून घेतले. लार्ज कॅप फंडात देशातील टॉप १०० मोठ्या कंपन्यांचा समावेश असतो.

मिडकॅप शेअर्समिडकॅप कंपन्यांमध्ये, म्युच्युअल फंडांनी येस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, प्रेस्टीज इस्टेट्स, एयू स्मॉल फायनान्स बँक आणि अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइझचे जास्तीत जास्त शेअर्स खरेदी केले. याउलट, सर्वाधिक विक्री हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ओला इलेक्ट्रिक, टाटा टेक्नॉलॉजीज, माझगॉन डॉक शिपबिल्डर्स आणि इंडसइंड बँकमध्ये दिसून आली. या फंडात रँकिंगनुसार, १०१ ते २५० दरम्यानच्या कंपन्यांचा समावेश असतो.

स्मॉल कॅप स्टॉक्सलहान समभागांबद्दल बोलायचे तर म्युच्युअल फंडांनी ITD सिमेंटेशन, फोर्स मोटर्स, वेलस्पन एंटरप्रायझेस, हिंदुस्तान फूड्स आणि गॉडफ्रे फिलिप्स इंडियामध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. तर, आरती फार्मलॅब्स, इंडिया सिमेंट्स, ब्लूजेट हेल्थकेअर आणि मन्नापुरम फायनान्समध्ये सर्वाधिक विक्री नोंदवली गेली.

(Disclaimer- यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक