Join us

Mutual Funds : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना तुम्ही तर 'ही' चूक करत नाही ना? अन्यथा हातात येतील कमी पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 1:58 PM

Mutual Funds : जर म्युच्युअल फंड योजनेचा एक्स्पेन्स रेशो म्हणजेच गुंतवणुकीचा खर्च जास्त असेल तर तुम्हाला मिळणाऱ्या वास्तविक परताव्यावर परिणाम होतो.

Mutual Funds Tips : शेअर मार्केटला पैशांचा समुद्र म्हटलं जातं, तुम्ही त्यातूनही कितीही पैसे कमावले तरी ते कमी होणार नाहीत. याच समुद्राच्या तुफानात अनेक रावाचे रंक झाल्याचीही उदाहरणे कमी नाहीत. अशात कमी जोखमीत पैसे कमावण्याचा सोपा मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड. अनेक म्युच्युअल फंड शेअर मार्केटमधील कामगिरीपेक्षाही चांगला परतावा देतात. यातूनच गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक कैक पटीने वाढली आहे. मात्र, अनेकजण फक्त फायदा पाहून कुठलाही तपास न करता पैसे लावतात. अशा लोकांना चांगला परतावा मिळत असला तरी प्रत्यक्षात हातात कमी पैसे मिळतात. तुम्ही जर ही चूक करत असाल तर लगेच ती दुरुस्त करा. अन्यथा वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यात काही अर्थ नाही.

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना काय चूक होते?साधारणपणे, म्युच्युअल फंड योजनेचे गुंतवणूकदार फक्त मागील १ ते ५ वर्षांचे परतावे काय? भविष्यातील परताव्याची शक्यता काय आहे? याचाच जास्त विचार करतात. गुंतवणूकदारांना असे वाटते की जर एखाद्या फंडाचा परतावा 10 टक्के किंवा 20 टक्के असेल तर त्यांनाही गुंतवणूक करून समान नफा मिळेल. परंतु अनेक गुंतवणूकदार एक्स्पेन्स रेशोकडे (Expense Ratio) लक्ष देत नाहीत. एक्स्पेन्स रेशो म्हणजे एखादा फंड चालवण्याचा खर्च. जर फंडाचे खर्चाचे प्रमाण जास्त असेल तर गुंतवणूकदारांना मिळणाऱ्या वास्तविक परताव्यावर परिणाम होतो.

तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडात १० हजार रुपये गुंतवले असं समजा. या फंडाचा एक्स्पेन्स रेशो १.६० टक्के इतका आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला एका वर्षात १५ टक्क्यांनी परतावा मिळाला. पण, तुमचा एक्स्पेन्स रेशो १.६० टक्के आहे. हा फंड खर्च वजा होऊन तुम्हाला प्रत्यक्षात फक्त १३.४ टक्केच मिळणार आहे. आता हाच एक्स्पेन्स रेशो जर १ टक्के असता तर अशात तुम्हाला १४ टक्के परतावा मिळेल.  

एक्स्पेन्स रेशो म्हणजे काय?म्युच्युअल फंड, मालमत्ता व्यवस्थापन कंपन्याद्वारे (AMCs) व्यवस्थापित केले जातात. ह्या AMC वितरण, विपणन, हस्तांतरण संरक्षक, कायदेशीर आणि लेखापरीक्षण यासारखे खर्च करत असते. हे खर्च म्युच्युअल फंडाच्या युनिट्स खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांकडून वसूल केले जातात. AMC हा सर्व खर्च एक्स्पेन्स रेशोच्या रूपात वसूल करते. खर्चाचे प्रमाण फंडातील गुंतवणूक स्वस्त आहे की महाग हे ठरवते. काही फंडांचे खर्चाचे प्रमाण जास्त आहे तर काहींचे कमी.

जास्त एक्स्पेन्स रेशो अधिक परतावा असं आहे का?म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी ही गोष्ट लक्षात ठेवा की एक्स्पेन्स रेशोवर तुमचा परतावा ठरत नाही. मात्र, बऱ्याच वेळा जास्त एक्स्पेन्स रेशो असलेले म्युच्युअल फंड कमी एक्स्पेन्स रेशो असलेल्या फंडांपेक्षा जास्त नफा देतात.

टॅग्स :गुंतवणूकनिधीशेअर बाजार