Join us  

SIP Pause Vs Close: एसआयपी पॉज करावी की बंद, अचानक पैशांची तंगी आल्यास काय कराल; कोणता पर्याय निवडावा?

By जयदीप दाभोळकर | Published: October 21, 2024 10:27 AM

SIP Pause Vs Close: समजा तुम्ही मासिक एसआयपी सुरू केली आणि अचानक तुमच्यासमोर अशी परिस्थिती आली की तुम्हाला एसआयपी चालू ठेवणं अवघड होऊन बसलंय, तर अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? जाणून घेऊया.

SIP Pause Vs Close: आजच्या काळात एसआयपी हा गुंतवणूकदारांचा पसंतीचा पर्याय बनला आहे. म्युच्युअल फंडांतील (Mutual Fund) गुंतवणूक एसआयपीच्या माध्यमातून केली जाते. अल्प बचतीतूनही एसआयपी सुरू करता येते आणि दीर्घकाळात त्या माध्यमातून मोठा फंड तयार करता येतो. हेच कारण आहे की आजच्या काळात लोक एकाच वेळी अनेक एसआयपी चालवत आहेत.

समजा तुम्ही ५,००० ते १०,००० रुपयांची मासिक एसआयपी सुरू केली आणि अचानक तुमच्यासमोर अशी परिस्थिती आली की तुम्हाला एसआयपी चालू ठेवणं अवघड होऊन बसलंय, तर अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? अशावेळी तुमच्यासमोर दोन पर्याय असतील, पहिला म्हणजे तुम्ही एसआयपी बंद करून पैसे काढू शकता आणि दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही एसआयपी काही काळासाठी थांबवू शकता म्हणजेच पॉज करू शकता आणि जेव्हा परिस्थिती चांगली होईल तेव्हा पुन्हा सुरू करू शकता. अशा परिस्थितीत कोणता निर्णय तुमच्यासाठी चांगला ठरेल हे आपण जाणून घेऊ.

SIP Pause म्हणजे काय?

आर्थिक संकटाच्या काळात या फीचरचा वापर करून तुम्ही तुमची स्कीम पूर्णपणे बंद करण्याऐवजी मध्येच थांबवू शकता. पूर्वी ही सुविधा १ ते ३ महिन्यांसाठी होती, परंतु आता काही फंड हाऊसेसनं ती ६ महिन्यांपर्यंत वाढवली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अॅसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणजेच एएमसीला 'पॉज' करण्याची विनंती करावी लागेल. रिक्वेस्ट सबमिट करताना तुमची कंपनी किती दिवस पॉजची सुविधा देते हे पाहावं लागेल. जर कंपनीनं तुमची विनंती मान्य केली तर तुमच्याकडून ठराविक काळासाठी एसआयपीचा हप्ता आकारला जाणार नाही. पण 'पॉज'चा कालावधी संपल्यानंतर एसआयपीचा हप्ता आपोआप तुमच्या खात्यातून कापायला सुरुवात होईल.

पॉज आणि बंदचा पर्याय कधी निवडावा?

मेडिकल इमर्जन्सी, जॉब गमावला किंवा अचानक मोठा खर्च तुमच्यावर येतो किंवा लग्न, घर खरेदी किंवा इतर कोणत्याही कौटुंबिक कारणं असू शकतात. यामुळे तुमच्यावर आर्थिक जबाबदारी वाढते आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्ही एसआयपीचा हप्ता सध्या चालू ठेवू शकणार नाही, पण काही काळानंतर तुम्ही ते पुन्हा सुरू करू शकता, अशा परिस्थितीत तुम्ही एसआयपी पॉजचा पर्याय निवडू शकता. पण जर आर्थिक अडचणी अशा असतील की तुमची परिस्थिती कधी सामान्य होईल हे तुम्हाला माहित नसेल तरच तुम्ही एसआयपी बंद करण्याचा निर्णय घेऊ शकता.

एसआयपी मध्येच बंद केल्यानंतर तुमचं ध्येय साध्य होण्याची कोणतीही आशा नसते, पण एसआयपी पॉज केल्या काही दिवस हप्ते भरण्यापासून दिलासा मिळतो, तसेच त्याचा परिणाम तुमच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टावर होत नाही. बाजारात तेजी असेल तर या पॉजनंतरही तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. याचं उत्तम उदाहरण कोविड काळात लोकांनी पाहिलंय. त्यावेळी आर्थिक संकटामुळे अनेकांनी पॉजच्या सुविधेचा फायदा घेत नंतर ती पुन्हा सुरू केली. कोविड १९ नंतर जेव्हा बाजार सावरण्यास सुरुवात झाली, तेव्हा त्यांना त्याचा जबरदस्त फायदा झाला होता.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकपैसा