Mutual Fund Investment : हल्ली अनेकांना गुंतवणूकीचं महत्त्वं समजलं आहे. गुंतवणूकीचे अनेक पर्याय असले तरी अनेक जण गुंतवणूकीसाठी म्युच्युअल फंडांकडे वळू लागलेत. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक शेअर बाजारातील जोखमीवर अवलंबून असली तरी अनेक जण याकडे वळत असल्याचं आकडेवारीवरून दिसून येतं. म्युच्युअल फंडातील एसआयपी हा हल्ली सर्वांचाच आवडता पर्याय ठरत आहे. याद्वारे तुम्ही १००,२०० रुपयांपासूनही गुंतवणूक सुरू करू शकता. यात मिळणारं चक्रवाढ व्याज तुम्हा दीर्घकाळात कोट्यधीश बनवू शकतं. अशाच एका म्युच्युअल फंडानं आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवलं आहे.
एसबीआय हेल्थकेअर अपॉर्च्युनिटीज फंडानं (SBI Healthcare Opportunities Fund) गुंतवणूकदारांच्या २५०० रुपयांच्या एसआयपीचे रूपांतर १ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेत केलं आहे. सुमारे २५ वर्षे जुन्या फंडानं आतापर्यंत वार्षिक आधारावर १८ टक्क्यांहून अधिक परतावा दिलाय. तर, गेल्या वर्षभरात त्याचा परतावा ३७ टक्क्यांच्या आसपास राहिला आहे.
२५ वर्ष जुना आहे फंड
या फंडाचा रिस्कोमीटर भरपूर हाय आहे. म्हणजेच तो हाय रिस्कच्या श्रेणीत येतो. हा फंड ५ जुलै १९९९ रोजी सुरू करण्यात आला. तेव्हापासून गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे. या फंडाची सर्वाधिक तरतूद आरोग्य सेवा क्षेत्रात आहे. हे अलोकेशन सुमारे ९३.२३ टक्के आहे. आरोग्य सेवेव्यतिरिक्त केमिकल्स आणि इतर क्षेत्रांमध्ये ही फंडानं पैसे गुंतवलेत. यातील सुमारे ३.५० टक्के तरतूद केमिकल आणि मटेरियल क्षेत्रासाठी आहे.
२५०० रुपयांचे झाले १ कोटी
या फंडाने लाँच झाल्यापासून वार्षिक आधारावर १८.२७ टक्के परतावा दिला आहे. जर तुम्ही त्यावेळी २५०० रुपयांची एसआयपी सुरू केली असती, म्हणजेच जर तुम्ही दरमहा २५०० रुपये गुंतवले असते तर आज तुमच्याकडे जवळपास १.१८ कोटी रुपयांचा फंड असता.
या २५ वर्षांत २५०० च्या एसआयपीमुळे एकूण ७.५० लाख रुपयांची गुंतवणूक झाली असती. उर्वरित रक्कम (सुमारे १ कोटी १० लाख रुपये) व्याजाच्या रुपात मिळाले असते. अशा परिस्थितीत तुम्ही या २५ वर्षांत मोठा निधी जमा करू शकला असता.
लंपसममध्येही उत्तम रिटर्न
या म्युच्युअल फंडानं गुंतवणूकदारांना एकरकमी गुंतवणूकीतही भरघोस परतावा दिला आहे. जर तुम्ही या फंडाला लाँच झाल्यापासून एकरकमी पैसे गुंतवले असते तर १७.१२ टक्के वार्षिक परतावा दिला असता. त्यावेळी तुम्ही एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर या २५ वर्षांत त्या एक लाख रुपयांचं मूल्य सुमारे ५५ लाख रुपये झालं असतं.
(टीप - यामध्ये म्युच्युअल फंडाच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)