Mutual Funds SIP : म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या दृष्टीनं अतिशय चांगल्या योजना मानल्या जातात. कालांतरानं म्युच्युअल फंड बराच लोकप्रिय झाला आहे. बाजाराशी निगडित असूनही या योजनेला दीर्घ मुदतीत चांगला परतावा मिळतो. सरासरी परतावा १२ टक्के असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. याशिवाय म्युच्युअल फंडांमध्ये फ्लेक्सिबलिटी आहे. एखादी व्यक्ती ५०० रुपयांपासून या योजनेत गुंतवणूक सुरू करू शकते आणि कालांतराने गुंतवलेली रक्कमही वाढवू शकते आणि जर कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण असेल तर मध्यंतरी काही काळ ही स्कीम थांबवताही येते.
यातील सर्व फीचर्स आणि उत्तम रिटर्न पाहता या स्कीम्स सध्या फार लोकप्रिय झाल्या आहे. परंतु जर एखाद्याचं वय १८ वर्षांपेक्षा कमी असेल आणि त्याला गुंतवणूक करायची असेल, तर ती व्यक्ती गुंतवणूक करू शकते का? जाणून घेऊ मायनर बाबत एसआयपीचे काय आहेत नियम.
काय आहेत नियम?
एसआयपीमध्ये गुंतवणुकीचं वय आणि गुंतवणुकीच्या रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. जितक्या लवकर तुम्ही यात गुंतवणूक कराल तितक्या लवकर तुम्हाला चांगले फायदे मिळू शकतील. परंतु १८ वर्षांखालील अल्पवयीन मुलासाठी ही गुंतवणूक त्यांचे पालक किंवा कायदेशीर पालक करू शकतात. पण अशा परिस्थितीत ते मूल एकमेव होल्डर असेल, जॉइंट होल्डरला परवानगी दिली जाणार नाही.
या कागदपत्रांची भासणार गरज
अल्पवयीन मुलांच्या बाबतीत गुंतवणूक करताना मुलांच्या वयाचा आणि मुलांशी असलेल्या नात्याचा पुरावा द्यावा लागतो. यासाठी अल्पवयीन मुलांची जन्मतारीख आणि पालकाच्या (नैसर्गिक किंवा कायदेशीर पालक) नात्याचा पुरावा म्हणून मुलाचा जन्म दाखला, पासपोर्ट किंवा असे कोणतेही वैध दस्तऐवज द्यावे लागतील. यामध्ये अल्पवयीन मुलांचं वय आणि त्यांचं पालकांशी असलेलं नातं याची माहिती द्यावी लागेल. त्याचबरोबर 'केवायसी'शी संबंधित नियमांचं पालन पालकानं करणं गरजेचं आहे. मुलांच्या खात्यातून थेट व्यवहार करता येतात, पण पालकांच्या बँक खात्याद्वारे व्यवहार केल्यास तुम्हाला थर्ड पार्टी डिक्लेरेशन फॉर्मही सादर करावा लागेल.
... तेव्हा एसआयपी बंद करावी लागेल
मूल अल्पवयीन असेपर्यंतच हे सर्व नियम लागू राहतील. मूल १८ वर्षांचं होताच पालकांना एसआयपी बंद करावी लागेल. अल्पवयीन मुल १८ वर्षांचं होण्यापूर्वी युनिटधारकाला त्यांच्या नोंदणीकृत पत्रव्यवहार पत्त्यावर नोटीस पाठविली जाईल. या नोटिशीत अल्पवयीन व्यक्तीला गुंतवणुकीतील आपली स्थिती 'मायनर'वरून 'मेजर' करण्यासाठी विहित कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याबाबत माहिती दिली जाईल.
(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)