टाटा म्युच्युअल फंड (Tata MF) ने हाऊसिंग फंड लाँच केला आहे. या श्रेणीतील हा तिसरा फंड आहे. घरांच्या वाढत्या मागणीचा फायदा घेणे हा या फंडाचा उद्देश आहे. हा फंड हाऊसिंग सेक्टरशी संबंधित अनेक व्यवसायांमध्ये गुंतवणूक करेल.
टाटा हाऊसिंग अपॉर्च्युनिटीज फंड बांधकाम साहित्याशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये अधिक गुंतवणूक करेल. ही नवीन फंड ऑफर (NFO) १६ ऑगस्ट रोजी उघडली आहे. निफ्टी हाऊसिंग इंडेक्स हा या फंडासाठी बेंचमार्क असेल. निफ्टी हाऊसिंग इंडेक्समध्ये ५० कंपन्यांच्या समभागांचा समावेश आहे. घराच्या कमी किमती, कमी गृहकर्ज दर, वाढते शहरीकरण, लो अनसोल्ड इन्व्हेंटरीज आणि नवीन प्रोजेक्ट लाँच यावर हा फंड लक्ष केंद्रित करणार आहे.
“निफ्टी हाऊसिंग इंडेक्समध्ये पायाभूत सुविधांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. हा फंड हाउसिंग थीमशी संबंधित विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करेल. आम्ही बांधकाम साहित्य क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करू, जे पोर्टफोलिओच्या ७० टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करू शकतात,” अशी प्रतिक्रिया टाटा हाऊसिंग अपॉर्च्युनिटीज फंडचे व्यवस्थापक तेजस गुटका यांनी दिली. “हा फंड मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करेल. सुरुवातीच्या पोर्टफोलिओपैकी सुमारे ४०-५० टक्के गुंतवणूक त्यात केली जाऊ शकते. या प्रकरणात, या फंडाचा दृष्टिकोन त्याच्या बेंचमार्क (निफ्टी हाउसिंग इंडेक्स) पेक्षा वेगळा असेल. या बेंचमार्कमध्ये ८८ टक्के लार्जकॅप कंपन्यांचा समावेश आहे,” असेही त्यांनी सांगितले. गेल्या १० वर्षांमधघ्ये रियल इस्टेटची कामगिरी चांगली नव्हती. परंतु या सेक्टरच्या सर्वच कंपन्यांनी चांगले रिटर्न्स दिले आहेत. या व्यवसायातील महसूल १२ ते १५ टक्क्यांनी वाढल्याचंही गुटका म्हणाले.
गुंतवणूक करावी का?
एचडीएफसी हाऊसिंग अपॉर्च्युनिटीज फंड (HDFC Housing Opportunities Fund) हा हाऊसिंग श्रेणीतील सर्वात जुना फंड आहे. डिसेंबर २०१७ मध्ये हा लाँच करण्यात आला. तेव्हापासून या फंडाने केवळ वार्षिक ५.६ टक्के रिटर्न दिले आहेत. याला आकर्षक रिटर्न म्हणता येणार नाही. टाटाच्या या फंडात केवळ असे गुंतवणूकदारच गुंतवणूक करू शकतात, ज्यांना बाजाराची चांगली जाण आहे. या फंडाचा ट्रॅक रेकॉर्ड असेल तेव्हाच त्यांनी गुंतवणूक करावी. जेव्हा याचा ट्रॅक रेकॉर्ड तयार होईल तेव्हाच यात गुंतवणूक केली पाहिजे. उर्वरित गुंतवणूकदारांसाठी डायव्हर्सिफाय इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक करणे चांगले ठरू शकते. (टीप - कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)