Join us

म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील 'हा' छुपा खर्च माहितीये का? नफ्यावर थेट होतो परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 12:39 IST

mutual fund expense ratio : तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल, तर तुम्ही एक्सपेन्स रेशो काळजीपूर्वक तपासणे महत्त्वाचे आहे. नाहीतर तुमचा नफा एक्सपेन्स रेशो घेऊन जायचा.

expense ratio : अलीकडच्या काळात गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंड लोकप्रिय होऊ लागले आहेत. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे २ मार्ग आहेत. थेट आणि एसआयपी. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणारे बहुतेक लोक फंडाचा पोर्टफोलिओ, त्याची मागील कामगिरी आणि फंड चालवणाऱ्या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीचे प्रोफाइल एवढेच पाहतात. मात्र, यावेळी ते महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. यामध्ये एक्सपेन्स रेशो म्हणजे खर्चाचे प्रमाण हा महत्त्वाचा घटक आहे. तुमची ही छोटीशी चूक तुम्हाला म्युच्युअल फंडातून मिळणाऱ्या परताव्यावर खोलवर परिणाम करू शकते. आज आपण म्युच्युअल फंडाच्या खर्चाचे प्रमाण काय आहे आणि त्याचा परताव्यावर कसा परिणाम होतो, हे जाणून घेऊ.

एक्सपेन्स रेशो म्हणजे काय? तुम्ही कोणत्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन एखादी वस्तू किंवा सेवा घेता, तेव्हा तुम्हाला त्याबदल्यात एक शुल्क द्यावे लागते. उदा. तुम्ही स्विगीवरुन जेवण मागवले. तर तुम्हाला जेवणाच्या पैशाव्यतिरिक्त डिलिव्हरी चार्ज द्यावा लागतो. त्याच प्रकारे, एक मालमत्ता व्यवस्थापन कंपनी आपल्या म्युच्युअल फंडाद्वारे तुम्हाला गुंतवणूक सेवा पुरवत असते. त्यासाठी तुम्हाला विशिष्ट फी भरावी लागते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एक्सपेन्स रेशो म्हणजे म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलेल्या पैशांवर फंड हाऊसद्वारे आकारले जाणारे शुल्क आहे. हे शुल्क फंड व्यवस्थापन, प्रशासकीय खर्च आणि इतर संबंधित खर्चांसाठी आकारले जाते.

एक्सपेन्स रेशो कसा आकारला जातो?

  • एक्सपेन्स रेशो सामान्यत: वार्षिक आधारावर टक्केवारी म्हणून आकारला जातो. उदाहरणार्थ, १% एक्सपेन्स रेशो म्हणजे तुमच्या गुंतवणुकीच्या मूल्याच्या १% शुल्क म्हणून आकारले जाईल.
  • एक्सपेन्स रेशोमध्ये विविध प्रकारचे खर्च समाविष्ट असतात, जसे की व्यवस्थापन खर्च, प्रशासकीय खर्च, विपणन खर्च आणि वितरण खर्च.
  • भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड (SEBI) ने एक्सपेन्स रेशोवर काही मर्यादा घातल्या आहेत, त्यामुळे गुंतवणूकदारांचे संरक्षण होते.
  • प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळा एक्सपेन्स रेशो असतो. उदाहरणार्थ, लार्ज-कॅप फंडचा एक्सपेन्स रेशो स्मॉल-कॅप फंडच्या एक्सपेन्स रेशोपेक्षा कमी असू शकतो.

परताव्यावर थेट परिणामखर्चाचे प्रमाण परताव्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम करते, म्हणून त्याचे गणित समजून घेणे आवश्यक आहे. अनेकदा उच्च खर्चाचे प्रमाण तुमच्या मोठ्या फंडातून मोठी रक्कम कमी करू शकते. समजा म्युच्युअल फंडाचे एक्सपेन्स रेशो १.५% आहे आणि तुम्ही त्यात १ लाख रुपये गुंतवले आहेत. अशा परिस्थिती मार्केट खाली जावो किंवा वर दरवर्षी तुमच्या निधीतून १,५०० रुपये निधी खर्च म्हणून कापले जातील.

समजा तुम्ही १० वर्षांसाठी दोन म्युच्युअल फंडांमध्ये SIP द्वारे दरमहा १०-१० हजार रुपये गुंतवले. फंड A चे खर्चाचे प्रमाण १ टक्के आणि फंड B चे २ टक्के आहे. दोन्ही फंडांचा सरासरी परतावा १३ टक्के आहे. खर्चाचे प्रमाण कमी केल्यानंतर, फंड A चा निव्वळ परतावा १२ टक्के आणि फंड B चा ११ टक्के असेल.

वाचा - तीव्र घसरणीतही 'या' म्युच्युअल फंडांचा २४ टक्केपर्यंत परतावा; १ वर्षात १ लाख रुपयांचे किती झाले?

गुंतवणूकदारांनी एक्सपेन्स रेशो का विचारात घ्यावा?

  • खर्च कमी करणे : कमी एक्सपेन्स रेशो निवडल्यास, गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीतून जास्त परतावा मिळवू शकतात.
  • गुंतवणुकीचे मूल्य वाढवणे : एक्सपेन्स रेशो कमी असल्यास, गुंतवणुकीचे मूल्य वाढण्याची शक्यता जास्त असते.
  • जास्त नफा : एक्सपेन्स रेशो कमी असल्यास, गुंतवणूकदारांना जास्त नफा मिळू शकतो.

 

टॅग्स :गुंतवणूकशेअर बाजारशेअर बाजारनिर्देशांक