Infosys Dividend: तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला आहे, असे श्रीमंतांच्या घरातील मुलांसंदर्भात नेहमी म्हटलं जातं. पण, जन्मासोबतच जर कोणी पैसे कमवायला लागलं तर? देशातील एका १७ महिन्यांच्या मुलाने ३.३ कोटी रुपये कमावले आहेत. वाचायला विचित्र वाटेल, पण हे खरे आहे. या मुलाला ही रक्कम लाभांश (डिव्हीडेंड) म्हणून मिळणार आहे. १७ महिन्यांचा हा मुलगा दुसरातिसरा कोणी नसून इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांचा नातू आहे. १७ एप्रिलला इन्फोसिस कंपनीने लाभांश जाहीर केला. नारायण मूर्ती यांचा १७ महिन्यांचा नातू एकाग्र रोहन मूर्ती याला कंपनीच्या अंतरिम लाभांशातून ३.३ कोटी रुपये मिळतील.
नारायण मूर्ती यांचा नातू 'एकाग्र' याच्याकडे सध्या इन्फोसिसचे १५ लाख शेअर्स आहेत, जे कंपनीतील ०.०४ टक्के हिस्सेदारीच्या समतुल्य आहेत. विशेष म्हणजे हे शेअर्स नारायण मूर्ती यांनी एकाग्र फक्त ४ महिन्यांचा असताना भेट म्हणून दिले होते. मार्च २०२४ मध्ये भेट दिलेल्या शेअर्सची किंमत २४० कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. इन्फोसिसच्या सध्याच्या शेअर किमतीनुसार, आता त्याचे मूल्य २१४ कोटी रुपये आहे.
इन्फोसिसकडून अंतिम लाभांश जाहीर
गुरुवारी, इन्फोसिसने प्रति शेअर २२ रुपये अंतिम लाभांश जाहीर केला. आता एकाग्रकडे १५ लाख शेअर्स असल्याने, त्याला लाभांश म्हणून ३.३ कोटी रुपये मिळतील. यासह, त्याचे आतापर्यंतचे लाभांशापासूनचे एकूण उत्पन्न १०.६५ कोटी रुपये होईल. नोव्हेंबर २०२३ मध्ये बेंगळुरू येथे जन्मलेला एकाग्र रोहन मूर्ती हा नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचा तिसरा नातू आहे. त्यांना दोन नातवंडे आहेत. कृष्णा आणि अनुष्का, अक्षता मूर्ती आणि ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या या मुली आहेत.
कुटुंबातील या सदस्यांना देखील लाभांश मिळणार
फक्त १ वर्ष ५ महिन्यांचा, एकग्र भारतातील सर्वात तरुण कोट्यधीशांपैकी एक आहे. कंपनीचे शेअर्स भेट म्हणून मिळाल्यापासून, इन्फोसिसने प्रति शेअर ४९ रुपयांच्या दराने तीन लाभांश जाहीर केले आहेत. या आधारावर, वर्षाच्या सुरुवातीला त्यांना अंतरिम पेमेंट म्हणून ७.३५ कोटी रुपये मिळाले.
वाचा - इन्फोसिसमध्ये पुन्हा एकदा नोकरकपात! कामावरुन काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांपुढे ठेवले २ पर्याय
नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती कंपनीतील १.०४ टक्के हिस्सा आहे. त्यांना इन्फोसिसच्या अंतिम लाभांशातून ८५.७१ कोटी रुपये देखील मिळतील. तर नारायण मूर्ती यांना स्वतः ३३.३ कोटी रुपये लाभांश म्हणून मिळतील, तर त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांना ७६ कोटी रुपये मिळतील. लाभांश मिळविण्याची रेकॉर्ड तारीख ३० मे निश्चित करण्यात आली असून पेमेंट ३० जून रोजी केले जाईल.