नवी दिल्ली - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जन-धन खातेधारकांना जीवन विमा आणि अपघात संरक्षण देण्याचा विचार करत आहे. सरकारची पंतप्रधान जीवन ज्योती विमा आणि पंतप्रधान सुरक्षा विमा अंतर्गत विमा संरक्षण देण्याची इच्छा आहे. अर्थ मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या एका निवेदनात म्हणण्यात आले आहे की," यासंदर्भात बँकांना आधीच सूचित करण्यात आले आहे. तब्बल 43 कोटी जन-धन खातेधारकांना सरकारच्या या निर्णयाचा लाभ मिळणे अपेक्षित आहे.
342 रुपये प्रीमियम -
पंतप्रधान जीवन ज्योती अंतर्गत, 2 लाख रुपयांचा जीवन विमा दैनंदिन 1 रुपयांपेक्षाही कमी प्रीमियमवर उपलब्ध आहे. यासाठी 330 रुपयांचा वार्षिक प्रीमियम भरावा लागतो. याच बरोबर, पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेत अकस्मिक अपघाताचा समावेश आहे. ही योजना अपघाती मृत्यू आणि संपूर्ण अपंगत्वासाठी 2 लाख रुपयांपर्यंत संरक्षण प्रदान करते. याशिवाय, आंशिक अपंगत्वासाठी, 1 लाख रुपये मिळतात. यासाठी वार्षिक 12 रुपये प्रीमियम भरावा लागतो. याचाच अर्थ, जन धन खातेधारकांना 342 रुपयांत 4 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळेल.
43 कोटींहून अधिक खातेदार -
पंतप्रधान जन-धन योजनेअंतर्गत बँक खातेधारकांची संख्या 43 कोटींहून अधिक झाली आहे. तर, या खात्यांतील रक्कम 1.46 लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक झाली आहे. पंतप्रधा मोदींनी PMJDYची घोषणा 15 ऑगस्ट 2014 रोजी केली होती. तसेच, आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी 28 ऑगस्ट रोजी लाँच करण्यात आली होती. या योजनेला आज सात वर्षे पूर्ण झाले आहे.
23.87 कोटी महिलांचे खाते -
अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 18 ऑगस्ट 2021पर्यंत अर्ध-शहरी आणि ग्रामीण भागातील जन-धन खातेधारकांची एकूण संख्या 43.04 कोटी झाली आहे. यातील 55.47 टक्के किंवा 23.87 कोटी खातेदार महिला आहेत आणि 66.69 टक्के अर्थात 28.70 कोटी खातेधारक पुरुष आहेत. या योजनेच्या पहिल्याच वर्षी 17.90 कोटी जन-धन खाती उघडण्यात आली होती.