लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : प्रवाशांनी गुटखा आणि पान खाऊन थुंकून केलेली घाण साफ करण्यासाठी रेल्वेला २०२१ मध्ये तब्बल १,२०० कोटींचा फटका बसला. रेल्वेमध्ये सिगारेट आणि दारूस बंदी आहे. मात्र, गुटखा आणि पान खाण्यास बंदी नाही.
त्यामुळे लोक गुटखा व पान खाऊन रेल्वेत थुंकून घाण करतात. याची साफसफाई हा आता रेल्वेसाठी जिकिरीचा विषय झाला आहे. पान व गुटख्यावर उपाय म्हणून रेल्वेने नागपूरच्या ईजीपिस्ट स्टार्टअप कंपनीसोबत करार केला आहे. या कंपनीने एक विघटनशील पिकदानी विकसित केली आहे. ती थुंकीला घन पदार्थात रूपांतरित करते. तसेच १५ ते २० वेळा तिचा थुंकण्यासाठी वापर करता येतो.