Join us  

सरकारी बँकांना घसघशीत नफा; वर्षभरात कमावले १.४२ लाख कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2024 9:53 AM

मार्च तिमाहीत एकूण १२ सरकारी बँकांचा नफा ४३,०९१ कोटी इतका झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षात विक्रमी नफा कमावला आहे. या वर्षात बँकांचा फायदा १२ टक्क्यांनी वाढून तब्बल १,४२,१२९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात बँकांनी १.०५ लाख कोटींचा नफा कमावला होता, तर २०२१-२२ मध्ये हा नफा ६६,५४० कोटी इतका होता.

सरकारने २०१६-१७ ते २०२०-२१ या काळात बँकांमध्ये ३.११ लाख कोटींची गुंतवणूक केली. यामुळेही बँकांना मोठा लाभ झाला. एकूण सरकारी बँकांपैकी युको बँक, इंडियन ओव्हरसीज आणि पंजाब अॅण्ड सिंध यांच्या नफ्यात घट नोंदवण्यात आली आहे. या वर्षात सर्व बँकांचा शुद्ध एनपीए घटून १.७० टक्क्यापेक्षाही कमी राहिला. बँक ऑफ महाराष्ट्रचा एनपीए सर्वांत कमी ०.२० टक्का, तर पंजाब अॅण्ड सिंध बँकेचा एनपीए सर्वाधिक १.६३ टक्का इतका राहिला.

मार्च तिमाहीत एकूण १२ सरकारी बँकांचा नफा ४३,०९१ कोटी इतका झाला. मार्च २०२३ मध्ये नफा ३४,४८३ कोटी इतका होता. एसबीआयला तिमाहीत सर्वाधिक २४ टक्के नफा झाला. बँक ऑफ महाराष्ट्रला ४५ टक्के, सेंट्रल बँकेला ४१ टक्के, तर इंडियन बँकेला ५५ टक्के नफा झाला आहे.

 

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियाएसबीआयशेअर बाजारशेअर बाजार