स्मार्टफोन, इंटरनेट आजकाल आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे घटक झाले आहेत. इंटरनेट, त्याचा स्पीड आणि त्यासाठी खर्च करावे लागणारे पैसे हा सर्वांनाच पडलेला प्रश्न असतो. आजकाल ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे तर मोठ्या प्रमाणात डेटाचा वापर केला जातो. परंतु भारतात इतर देशांच्या तुलनेत अतिशय कमी किंमतीत डेटा मिळत असल्याची माहिती समोर आली आहे.
भारत हा जगातील एक असा देश आहे ज्या ठिकाणी १ जीबी डेटासाठी सर्वात कमी पैसे द्यावे लागतात. तर दुसरीकडे असेही काही देश आहेत ज्या ठिकाणी एक जीबी डेटासाठी २ हजार रूपयांपर्यंत खर्च करावा लागतो. पाहुया जगातील काही असे देश ज्या ठिकाणी १ जीबीसाठी सर्वात कमी आणि सर्वात जास्त पैसे द्यावे लागत असतील.
या देशांमध्ये सर्वात स्वस्त डेटा
Visual Capitalist च्या एका अहवालानुसार भारत, इस्रायल, किर्गिझस्तान, इटली आणि युक्रेन या देशांमध्ये सर्वात स्वस्त डेटा दिला जातो. या देशांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारतात एक जीबी डेटासाठी ०.०९ डॉलर्स म्हणजेच जवळपास साडेसहा रुपये द्यावे लागतात. दुसऱ्या क्रमांकावर इस्रायल आहे. इस्रायलमध्ये एक जीबी डेटासाठी ग्राहकांना ०.११ डॉलर्स म्हणजे जवळपास ८ रूपये द्यावे लागतात. तर किर्गिझस्तानमध्ये १ जीबी डेटासाठी जवळपास १५.३ रूपये, इटलीमध्ये जवळपास ३१.३८ रूपये आणि युक्रेनमध्ये जवळपास भारतीय रूपयांत ३३.५६ रूपये द्यावे लागतात.
Cost of 1GB of mobile data:
— Vala Afshar (@ValaAfshar) June 7, 2021
India 🇮🇳: $0.09 (lowest)
Israel 🇮🇱: $0.11
United States 🇺🇸: $8
Canada 🇨🇦: $12.55 pic.twitter.com/K1XO1dpnGe
या देशात महागडा डेटा
ज्या देशांमध्ये १ जीबी डेटासाठी सर्वाधिक पैसे खर्च करावे लागतात त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर मालावी येतो. या ठिकाणी ग्राहकांना १ जीबी डेटासाठी २७.४१ डॉलर्स म्हणजेच जवळपास २ हजार रूपये द्यावे लागतात. बेनिनमध्ये ग्राहकांना एका जीबीसाठी जवळपास १९८६ रूपये, चॅडमध्ये जवळपास १७०० रुपये. येमेनमध्ये ११६६ रूपये आणि बोत्सवानामध्ये भारतीय रुपयांता १०१२ रुपये आकारले जातात. अमेरिकेत ग्राहकांकडून १ जीबी डेटासाठी ८ डॉलर्स म्हणजेच जवळपास ५८३ रूपये आणि कॅनडामध्ये १२.५५ डॉलर्स म्हणजे जवळपास ९१६ रूपये आकारले जातात.