नवी दिल्ली : येथील प्रगती मैदानावर सुरू असलेल्या ‘इंडिया मोबाइल काँग्रेस २०२३’मध्ये शुक्रवारी रिलायन्स जिओचे चेअरमन आकाश अंबानी यांनी ‘जिओ स्पेस फायबर’ तंत्रज्ञान सादर केले. या तंत्रज्ञानामुळे दूरवर्ती भागात फाइव्ह-जी हाय स्पीड इंटरनेट पोहोचविणे शक्य होणार आहे.
प्रगती मैदानात पहिलाच स्टॉल जिओ इन्फोकॉमचा आहे. आकाश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिओ एयर फायबर व स्पेस फायबर यांसह अन्य अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली. यात जिओ भारत फोनही ठेवला आहे. हा फोन पंतप्रधान मोदी यांनी पाहिला. ‘जिओ स्पेस फायबर’ हे उपग्रहावर आधारित गिगा फायबर तंत्रज्ञान आहे. फायबर केबलची जोडणी जेथे अशक्य आहे, तेथे याद्वारे ब्रॉडबँड पोहोचवता येते. याद्वारे संपूर्ण देशात माफक दरात फाइव्ह-जी ब्रॉडबँड पोहोचविण्याची योजना आहे. (वृत्तसंस्था)
चार ठिकाणी सुरुवात
गिर (गुजरात), कोरबा (छत्तीसगड), नबरंगपूर (ओडिशा), जोरहाट (आसाम)
काय आहेत वैशिष्ट्ये?
या सेवेसाठी सॅटेलाइट टेलिकम्युनिकेशन (एसईएस) कंपनीच्या उपग्रहाचा वापर होणार. या तंत्रज्ञानात इंटरनेट ट्रान्समिशनसाठी मॉडेमशी जोडलेल्या रेडिओ लहरींचा वापर करण्यात येतो. जिओ फायबर आणि जिओ एयर फायबर नंतरचे रिलायन्स कनेक्टिव्हिटी पोर्टफोलिओतील हे तिसरे मोठे तंत्रज्ञान आहे.
ऑनलाइन सरकार, शिक्षण, आरोग्य आणि मनोरंजन या सेवांसाठी जिओ स्पेस फायबर प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी कनेक्ट करू शकते.
- आकाश अंबानी, चेअरमन, रिलायन्स जिओ