मुंबई : बाजारातील २ हजार रुपयांच्या ८० टक्के नोटा जरी बँकेत जमा झाल्यास बँकांमधील रोकड १ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक होण्याची शक्यता एका अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. एसबीआय इकोरॅप अहवालानुसार, जर २ हजार रुपयांची नोट जमा करण्याचा ट्रेंड कायम राहिला तर बँक प्रणालीत १,००,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम जमा होईल.
अहवालात असे म्हटले आहे की, हा अंदाज सध्या उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारित आहे आणि पुढे तो बदलू शकतो. बाजाराच्या ट्रेंडनुसार, २,००० रुपयांच्या नोटांपैकी सुमारे ८०% नोटा जमा करण्यात येतात आणि उर्वरित २०% लहान मूल्यांच्या नोटांसाठी बदलण्यात येतात. यामुळे बँकांमध्ये रोकडचा फुगा येईल, असे अहवालात म्हटले आहे. आरबीआयने १९ मे रोजी २,००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. याअंतर्गत एखादी व्यक्ती एकावेळी २०,००० रुपयांच्या नोटा बदलू शकते. नोट बदलण्याची सुविधा २३ मे ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत देण्यात आली आहे.
अर्थव्यवस्थेवर परिणाम?
एकूण चलनात असलेल्या सर्व नोटांमध्ये २ हजारच्या नोटेचे प्रमाण केवळ १०.८% असल्याने अर्थव्यवस्थेवर अतिशय कमी परिणाम होईल. २ हजारच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये जमा होतील, असा विश्वास आहे.
शक्तिकांत दास,
गर्व्हनर, आरबीआय
उत्पन्न आणि बचतीतही घट
गेल्या काही आर्थिक वर्षांमध्ये लोकांच्या बचतीमध्ये घट झाली आहे. ११.८ टक्के असताना बचत आता ११.१%वर आली आहे.
उत्पन्नाचा स्रोतही कमी झाल्याने ठेवी ठेवण्याचे प्रमाणही आर्थिक वर्ष २०१९च्या ४.२ टक्केच्या तुलनेत ३.४%वर आले आहे.
इन्शुरन्स फंडमधील गुंतवणूक कमी झाली असून, शेअर्स आणि पीएफमधील गुंतवणूक वाढली आहे.
अनेक नोटा गायब?
आता लोक थेट ५०० रुपयांची नोट देत व्यवहार करत असल्याचे आकडेवारीतून समोर येते.
गेल्या काही वर्षांमध्ये २ रुपये, १० रुपये आणि ५०, १०० रुपयांच्या नोटांचे प्रमाण कमी होताना दिसते आहे.
१० रुपयांच्या नोटेत तर आर्थिक वर्ष २३ मध्ये -११.६% इतकी घट झालेली आहे.
५० रुपयांची नोटही कमी झाली असून तिचे प्रमाण ०.३ टक्के इतके वाढले आहे.