नवी दिल्ली : देशातील वस्तू आणि सेवा कराच्या(जीएसटी) वसुलीमध्ये सलग तिसऱ्या महिन्यामध्ये वाढ झाली असून, नोव्हेंबर महिन्यात पुन्हा एकदा एक लाख कोटी रुपयांचा टप्पा पार झाला आहे. असे असले तरी नोव्हेंबर महिन्यातील वसुली ऑक्टोबर महिन्यापेक्षा काहीशी कमी झाली आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा झालेल्या वस्तू व सेवा कराची आकडेवारी मंगळवारी जाहीर केली. नोव्हेंबर महिन्यात १ लाख ४ हजार ९६३ कोटी रुपयांचा कर महसूल गोळा झाला आहे. ऑक्टोबर महिन्यातही १ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक जीएसटी वसूल झाला होता. त्यापेक्षा नोव्हेंबर महिन्यात १९२ कोटी रुपयांचा महसूल कमी जमा झाला आहे. मागील वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये १.०३ लाख कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला होता. देशातील आर्थिक स्थितीचे चित्र जीएसटीच्या वसुलीमधून स्पष्ट होत असते. देशात विक्री झालेल्या वस्तू आणि सेवांवर हा कर लावला जात असतो.