- विकास झाडे
नवी दिल्ली : एक लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष नोकऱ्या औषधनिर्माण क्षेत्र देऊ शकतो. प्रोत्साहन योजनेंतर्गत विविध योजनांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय रसायनमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली.
औषधनिर्माण क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाकडून काही योजना आखल्या आहेत का? आणि या क्षेत्रात पुढे नोकरीच्या किती संधी उपलब्ध आहेत? असा प्रश्न खासदार श्रीरंग बारणे आणि प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत उपस्थित केला. यावर उत्तर देताना मांडविया म्हणाले, औषधनिर्माण क्षेत्रातील सहा वर्षांच्या कालावधीत तीन टप्प्यांमध्ये उत्पादन होणार आहे. या उत्पादन प्रक्रियेत १ लाख ९६ हजार कोटी इतक्या प्रमाणात उत्पादन निर्यात होण्याची शक्यता आहे. शिवाय या क्षेत्रामुळे देशात २० हजार प्रत्यक्ष आणि ८० हजार अप्रत्यक्ष नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतील. या क्षेत्राच्या विकासासाठी १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.
पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन योजनेद्वारे रामायण परिक्रमा ही एक उच्चभ्रू थीमॅटिक सर्किट आहे. ज्याअंतर्गत दोन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.
कोरोनामुळे अनाथ मुलांना अर्थसाहाय्य व्हावे
कोरोनामुळे जी मुले अनाथ झालीत अशांना ओळखण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम राबवावी, अशा मुलांना ते प्रौढ होईपर्यंत केंद्र सरकारने पॅकेज द्यावे. त्यांचे पालन-पोषण आणि शिक्षण दीक्षा देण्याचा निर्णय लवकर करण्यात याव्यात, अशी मागणी भाजपाचे लातूरचे सदस्य सुधाकर श्रंगारे यांनी लोकसभेत केली.
नियम ३७७ नुसार केलेल्या या मुद्यावर श्रंगारे यांनी म्हटले आहे की, देशभरात ४ लाख १८ हजार ९८७ लोकांचा कोरोनाचे बळी घेतला. रोगामुळे सुमारे १ लाख १९ हजार मुले अनाथ झाली आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत १ लाख ३० हजार ९१८ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असला तरी येथे फक्त ५ हजार अनाथ मुलांची ओळख पटली आहे.
तथापि, पंतप्रधानांनी पंतप्रधान केअर फंडामधून अशा प्रत्येक मुलासाठी १० लाख रुपयांची निश्चित ठेव आणि १८ वर्षांपर्यंत या ठेवीच्या व्याजातून दरमहा अर्थसाहाय्य देण्याची घोषणा केली.