Vodafone Idea Share: टेलिकॉम क्षेत्रातील कंपनी वोडाफोन आयडियाबाबत गुरुवारी मोठी बातमी आली. त्याचा परिणाम आज म्हणजेच शुक्रवारी कंपनीच्या शेअर्सवर दिसून आला. बीएसईवर कंपनीचे शेअर्स 16.67 रुपयांच्या पातळीवर उघडले. मात्र काहीच वेळात तो 8 टक्क्यांहून अधिक वाढीसह 17.65 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. जो कंपनीच्या 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 18.42 च्या अगदी जवळ आहे.
संचालक मंडळाची बैठक 27 फेब्रुवारीला म्हणजेच पुढील आठवड्यात होणार आहे. या बैठकीत निधी उभारणीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. शेअर बाजारांना दिलेल्या माहितीत आदित्य बिर्ला समूहाच्या या दूरसंचार कंपनीनं इक्विटी आणि डेट इन्स्ट्रुमेंटद्वारे निधी उभारण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं म्हटलं आहे.
या वृत्तानंतर शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. गुरुवारीही कंपनीच्या शेअर्सची किंमत 6.27 टक्क्यांच्या वाढीसह 16.28 रुपयांच्या पातळीवर बंद झाली.
डिसेंबर तिमाहीत काय स्थिती
आम्ही काही बाह्य गुंतवणूकदारांनाही आणण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, याबाबत कोणतीही कालमर्यादा सांगता येणार नाही, अशी माहिती काही दिवसांपूर्वीच आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी दिली होती. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा तोटा 6986 कोटी रुपयांवर आला आहे. कंपनीच्या दृष्टिकोनातून चांगली गोष्ट म्हणजे प्रति ग्राहकांवरील त्यांची सरासरी कमाई मात्र वाढली आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)