नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य संघटनेला (ईपीएफओ) जून २०२४ मध्ये १९.२९ लाख सदस्य जोडले गेले असून, त्यातील १०.२५ लाख सदस्य नवीन आहेत. २०२३ च्या तुलनेत ईपीएफओची सदस्यसंख्या जून २०२४ मध्ये जवळपास ७.८६ टक्के वाढली आहे.
सूत्रांनी सांगितले की, रोजगाराच्या संधीतील तेजी, कर्मचारी लाभ आणि ईपीएफओ योजनेबाबत जागरूकता यामुळे सदस्य संख्या वाढली आहे. ईपीएफओ डेटानुसार, जून २०२४ मध्ये १०.२५ लाख नवे सदस्य ईपीएफओला मिळाले. मे २०२४ च्या तुलनेत हा आकडा ४.०८ टक्के, तर आदल्या वर्षाच्या तुलनेत तो १.०५ टक्के जास्त आहे.
जूनमध्ये जोडल्या गेलेल्या सदस्यांत ५९.१४ टक्के सदस्य १८ ते २५ या वयोगटातील आहेत. तरुणांना रोजगाराच्या संधी मिळत असल्याचे त्यातून दिसून येते. यातील बहुतांश सदस्य पहिली नोकरी करणारे आहेत.
३ लाख महिलांना मिळाली नोकरी
नवीन सदस्यांत २.९८ लाख महिला असून, वार्षिक आधारावर महिलांची संख्या ५.८८ टक्के वाढली आहे. जून २०२४ मध्ये एकूण ४.२८ लाख महिला ईपीएफओशी जोडल्या गेल्या.
१४ लाखांपेक्षा अधिक सदस्य पुन्हा जोडले गेले
ईपीएफओच्या पेरोल डेटानुसार, २०२४ मध्ये १४.१५ लाख सदस्य दुसऱ्यांदा ईपीएफओशी जोडले गेले आहेत.
या लोकांनी आपली नोकरी बदलली आहे अथवा ते पुन्हा संघटनेत सहभागी झाले आहेत.
या सर्वांनी आपली ईपीएफओतील रक्कम काढण्याऐवजी खाते स्थलांतरित केले आहे.